सातारा: २७ वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा असल्याचे सांगत वृद्ध महिलेला फसवणाऱ्या व त्यांची मालमत्ता बळकवणाऱ्या भोंदूबाबाला दहिवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एकनाथ रघुनाथ शिंदे, (ओझर बुद्रक, ता जामनेर,जळगाव) असे त्याचे नाव आहे. शिंदी बुद्रुक (ता. माण) येथे एखाद्या चित्रपटाला साजेल असा प्रकार समोर आला आहे. गावातील द्वारकाबाई विष्णू कुचेकर या महिलेचा २७ वर्षांपूर्वी १९९७ साली एकुलता एक आठवीत असणारा मुलगा हरवला. कुटुंबासह पोलिसांनी शोध घेतला. मात्र तो मिळाला नाही. दोन वर्षांपूर्वी एक साधू घरातील वृध्द महिलेसमोर आला आणि त्याने आई मला ओळखलेस का? असे म्हणत घट्ट मिठी मारून मीच तुझा मुलगा असे सांगितले. त्या महिलेसह त्या महिलेच्या विवाहित बहिणींनाही खरे वाटले. त्याने रेशनकार्ड, आधार कार्ड यासह घरातील सर्व मालमत्तेवर नाव नोंदवले.

हेही वाचा: Ranjitsinh Mohite Patil : मोहिते-पाटील कुटुंबीय भाजपच्या रडारवर !

आपला मुलगा कधीतरी घरी येईल अशी, आशा या महिलेला होती. मागील दहा वर्षांपूर्वी संशयित भोंदूबाबा एकनाथ शिंदे हा त्या वृद्ध महिलेच्या घरी भिक्षा मागण्यासाठी आला होता. त्यावेळी त्या वृद्ध महिलेकडून मुलाविषयी, मालमत्तेविषयी माहिती घेतली. दहा वर्षांनंतर भोंदूबाबाने घरात प्रवेश करून तब्बल दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीत घरात राहून घरातील मालमत्तेसह पैशावर अधिकृत दावा केला. महिलेचे निधन झाल्यानंतर सर्व विधीही यानेच पूर्ण केले व नंतर तो निघून गेला. वर्षश्राध्दाच्या वेळी तो पुन्हा आला. त्यावेळी गावकऱ्यांनी शंका व्यक्त करत पोलिसांना माहिती दिली. आणि त्या वृध्द महिलेचा मुलगा सोमनाथ कुचेकर म्हणून वावरणारा हा बुवा भामटा असल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपी शिंदेला अटक केली आहे.

Story img Loader