सातारा : वडिलांसोबत शेतात गेलेल्या पाच वर्षांच्या मुलावर तरसाने केलेल्या हल्ल्यानंतर वडिलांनी तरसा बरोबर निकराचा लढा देत मुलाला वाचविले. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या चेहऱ्यासह डोक्यामध्ये गंभीर जखमा झाल्या आहेत. वडिलांनी मुलासाठी तरसाशी दिलेल्या झुंजीचे परिसरात कौतुक होत आहे. पिंपरी (ता. कोरेगाव) येथे बाळूबाचा डोंगर परिसरातील तरस खोरे नावाच्या शिवारात संतोष दाजी मदने हे शेळ्या चारण्यासाठी निघाले होते. मुलांनी त्यांच्याबरोबर येण्याचा हट्ट धरल्याने त्यांनी पाच वर्षांचा मुलगा संकेत याला बरोबर घेतले.

हेही वाचा : राज ठाकरेंची लाडकी बहीण योजनेवर अप्रत्यक्षरित्या टीका; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “ज्या लोकांना सरकारची…”

शनिवारी सायंकाळी साडेचार पाच वाजण्याच्या सुमारास वडिलांपासून सुमारे वीस ते पंचवीस फूट अंतरावर संकेत खेळत होता. वडिलांचे लक्ष शेळ्या चारण्यात गुंतले असताना अचानक मुलाच्या ओरडण्याचा आवाज आला. वडिलांनी पाठीमागे फिरून पाहिले असता तरसाने मुलाचे डोके तोंडात धरल्याचे दिसून आले. त्यांनी तरसावर झडप घालून त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. अचानक हल्ला झाल्यामुळे तरसाने मुलाचे डोके सोडून संतोष मदने यांच्यावर हल्ला केला. परंतु संतोष मदने यांनी निकराचा लढा देऊन तरसाला पिटाळून लावले. तरसाने चिमुकला संकेत मदने याचे डोके जबड्यात धरल्यामुळे त्याच्या गालासह डोक्यात दाताच्या गंभीर जखमा झाल्या असून डोके रक्ताने माखले होते. या घटनेची माहिती संतोष मदने यांनी कुटुंबीयांसह मित्रांना दिली. जखमी संकेत मदने याला रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ नीलम मदने यांनी जखमी संकेत याची तपासणी करून त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. अधिक उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्याची सूचना दिली. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे या घटनेची वन विभागाने दखल घेणे गरजेचे असल्याचे मत परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.