वाई: खून करून अपघाताचा बनाव केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेसह भुईंज पोलिसांना यश आले आहे. दि. १९ मे रोजी सुरूर पुलाखाली अपघातातील जखमी पडला आहे. ॲम्बुलन्स व पोलीस पाठवा. या माहितीवरून भुईंज पोलिसांनी जखमीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले. उपचारादरम्यान संबंधितांचा मृत्यू झाला. याबाबत भुईंज पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती.
याप्रकरणी माळावरची झोपडपट्टी, सुरूर तसेच सुरूर गावातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यामध्ये संशयित एका दुचाकीवरून दोघांच्यामध्ये संबंधित जखमीस बसवून घेऊन जात असल्याचे दिसून आले. त्यावरून संशय निर्माण झाल्याने तसा तपास केला असता, संबंधित व्यक्ती अपघातात जखमी झाला नसून त्यास संशयित जक्कल रंगा काळे आणि त्याच्या घरातील तीन लोकांनी मारल्याचे उघडकिस आले. संबंधिताचे जक्कल काळे याच्या दुसऱ्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्याच्या डोक्यात दगड घालून जखमी केले होते. व त्यानंतर पुलाखाली आणून टाकून दुसरा संशयित मक्शा रंगा काळे याने त्याच्या मोबाईल नंबरवरून पोलिसांना फोन करून अपघाताचा खोटा बनाव तयार केला होता.
हेही वाचा : डाळिंब शेतीत कष्ट करत सव्वा कोटीचे उत्पन्न घेणारं पोरगं दहावी पास झालं अन् गाव हरकलं
पथकाने संशयितांच्या ठावठिकाणांची माहिती काढून तीन पुरुष व एका महिलेस ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. संशयित जक्कल रंगा काळे याच्यावर २८ गंभीर गुन्हे दाखल असून अट्टल गुन्हेगारांकडून खुनासारखा गंभीर गुन्हा उघड केल्याबद्दल कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक तसेच वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
हेही वाचा : सोलापूर: वयोवृद्ध सेवानिवृत्त शिक्षकाला विद्यार्थ्यानेच घातला १२.५० लाखांस गंडा
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे, पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला.
© The Indian Express (P) Ltd