सातारा : पीएम जनमन योजनेंतर्गत जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील ७० ग्रामपंचायतींमध्ये २५७ आदिवासी कातकरी कुटुंबांना हक्काच्या पक्का निवारा मिळणार आहे. त्याचप्रमाणे ४४७ बेघर लाभार्थीना जागा मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात घरकुलांची कामे गतीने सुरू असून, घरकुलांमुळे सर्व घटकांना घर मिळणार आहे.
ग्रामपंचायत अधिकारी यांच्यामार्फत केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात आदिवासी कातकरी कुटुंबे ही हक्काच्या पक्क्या निवाऱ्यापासून वंचित असल्याचे निदर्शनास आले. या कुटुंबांना घरकुल मंजूर करण्यासाठी जागेची अडचण होती. आजअखेर २५७ लाभार्थीना जागा उपलब्ध करून देऊन घरकुलांची मंजुरी दिली आहे. प्रति घरकुल बांधकामासाठी थेट दोन लाख रुपये तसेच मनरेगा अकुशल मजुरी २८ हजार ८० व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १२ हजार रुपये असे दोन लाख ४० हजार ८० रुपये एवढे अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
आजअखेर मंजुरी पैकी २५ घरकुले पूर्ण झाली असून, उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. दरम्यान, जिल्ह्यात सातारा तालुक्यात आमले, नुने गवडी, अगुंडेवाडी, नागठाणे, अंबवडे खुर्द, आरळे, फलटण तालुक्यात खामगाव, वाई तालुक्यात असले, पाचवड, जावळी तालुक्यात आसनी, खर्शी बारामुरे, केळघर तर्फ मेढा, कुडाळ, महिगाव, रायगाव, मामुडर्डी, सायगाव, कऱ्हाड तालुक्यात करंजोशी, कोर्टी, पाल, खंडाळा तालुक्यात शिरवळ, महाबळेश्वर तालुक्यात दुधगाव, गोगवे, पाटण तालुक्यात मुरूड आदी ठिकाणचे गृहसंकुल प्रकल्प प्रगतिपथावर आहेत.
गरजू लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्थांनी लाभार्थीना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. जागा उपलब्ध करून देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी गट विकास अधिकारी व जिल्हास्तरावर ग्रामीण विकास यंत्रणेशी संपर्क साधावा.- याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा.