सातारा: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारतीच्या छताला मागील चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. अखंड गळतीमुळे फरशीवर अन्यत्र ठिकठिकाणी पाणी साठले आहे. तसेच भिंतीही ओल्या होऊन शॉर्टसर्किट होत आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षक- कर्मचाऱ्यांचे हाल होत असून पांढऱ्या डॉक्टरी पोशाखा ऐवजी रेनकोट घालून पाणी काढावे लागत आहे.
कृष्णानगर, सातारा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे तूर्तास महाविद्यालयीन कामकाज व अध्यापन साताऱ्यात जिल्हा शासकीय रुग्णालयाशेजारील इमारतीमध्ये सुरू आहे. याच इमारतीत महिला रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने विस्तारीकरणासाठी इमारतीचा एक मजला वाढवण्यात येत आहे. ऐन पावसाळ्यात हे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावेळी छतावरील खांब फोडण्यासाठी ब्रेकरचा उपयोग गेला आहे. कॉलम फोडल्यापासून इमारतीच्या वरील छतातून पाणी झिरपू लागले आहे. हे पाणी बीममधून मोठ्या प्रमाणावर खालील मजल्यांवर गळत असल्याने याठिकाणी भिंती ओल्या झाल्या आहेत. ओल्या भिंतीतून शॉर्टसर्किट होण्याचेही प्रकार घडले आहेत. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महाविद्यालयीन प्रशासनाच्या वतीने इमारतीमधील विद्युत पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक मजल्यावर पाणी साठले आहे. महाविद्यालय ग्रंथालय, अध्यापन वर्ग, इतर कार्यालये, प्रयोगशाळा येथील मौल्यवान उपकरणे, संगणक, ग्रंथसंपदा टेबलांवर ठेवून प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवली आहेत. खुर्च्या, बसण्याचे साहित्य टेबलवर ठेवले आहे.
हेही वाचा : प्रेयसीसह मुलांना नदीत टाकल्याच्या घटनेत न्यायासाठी वारसदारांचे थेट मुख्यमंत्र्यांना साकडे
शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या सुसज्ज इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे काम मार्च २०२५ पर्यंत होऊ शकते, अशी माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली. सफाई कर्मचारीं इमारतीमध्ये पाणी काढत आहेत. जास्त पाणी गळत असलेल्या ठिकाणी बादली लावणे, फरशीवर साचलेले पाणी बाहेर काढणे हाच दिवसभराचा उद्योग झाला आहे.