वाई : महाबळेश्वर तालुक्यात इको सेन्सिटिव्ह झोन व बांधकाम निषिद्ध क्षेत्रात पर्यावरणाला अडथळा ठरणाऱ्या भिलार कासवंड, भोसे, पांगरी, खिंगर येथील अनधिकृत बांधकामे सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वाईच्या प्रांताधिकार्यांनी मोठ्या पोलीस बंदोबस्तात तोडण्यास सुरुवात केली आहे. महाबळेश्वर तालुका नेहमीच अनधिकृत बांधकामांसाठी चर्चेत राहिलेला आहे. पर्यावरण प्रेमींनी मुख्यमंत्र्यांकडे येथील अनधिकृत बांधकामांबाबत तक्रार केली होती. मुख्यमंत्र्यांनी अशी अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आदेश सातारा जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्याप्रमाणे आज सकाळी पर्यावरणाला अडथळा ठरणाऱ्या भिलार, भोसे, खिंगर येथील अनधिकृत बांधकामे काढून घेण्याबाबत सर्वांना नोटीस बजावण्यात आली होती.
हेही वाचा : ताप, सर्दी, खोकला असल्यास करोना चाचणी करा, राज्य करोना कृती दलाच्या सूचना
या बांधकामांवर जिल्हा प्रशासनाने आज सकाळी हातोडा उगारला. प्रशासनाने जेसीबी, पोकलेनच्या सहाय्याने इमारतीचे बांधकाम उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू केले .जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या मार्गदर्शनाखाली वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तेजस्विनी पाटील , वाई तहसीलदार सोनाली मेटकरी, खंडाळा तहसीलदार विजय पाटील यांच्यासह अनेक नायब तहसीलदार, महसूल अधिकारी, कर्मचारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त यासाठी तैनात करण्यात आला आहे. आज महसूलचे शंभराहुन अधिक कर्मचारी-अधिकारी आणि दीडशे पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या बंदोबस्तात हे काम करण्यात आले. यामुळे अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. स्थानिक मध्यस्थांना (एजंट्सना) हाताशी धरून अनेक धनाढ्य व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात हॉटेल्स, बंगले आणि रिसॉर्टची अनधिकृत बांधकामे केली आहेत. आता ही मोहीम कोणतीही तडजोड न करता, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कायम सुरू राहावी अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.