वाई: अभिनेता सलमान खान सध्या महाबळेश्वर येथे चित्रीकरणासाठी मुक्कामी आहे. महाबळेश्वरला पोहोचलेल्या सलमानचा मुक्काम मात्र डिएचएफएल घोटाळ्यातील आरोपी व सध्या सीबीआयच्या कोठडीत असलेल्या वाधवानच्या बंगल्यात आहे. त्याने वाधवानच्या बंगल्यात वास्तव्य केल्यामुळे सलमान नवीन वादात अडकला आहे. त्यामुळे सलमानने वास्तव्यासाठी हाच बंगला का निवडला याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या बंगल्यात सलमानच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आज आले आहेत.
दरम्यान वधवान हाऊस मध्ये सलमान खान राहायला आल्यानंतर हा बंगला सीबीआयने वाधवानच्या डीएचएफएलच्या घोटाळ्यामध्ये सील केलेला असताना कोणाच्या परवानगीने हा बंगला खुला करण्यात आला. कोणाच्या दबावाने पाणी आणि वीज पुरवठा सुरू करण्यात आला. याची माहिती महाबळेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्याकडे सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी मागितली आहे. जर योग्य माहिती मिळाली नाही तर न्यायालयात जाणार असल्याचा इशारा मोरे यांनी दिला आहे.
हेही वाचा : सांगली: प्रेमी युगुलाची गळफास लावून आत्महत्या
सलमानने साताऱ्यातील महाबळेश्वर येथे आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावी व घरी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, दाट धुक्यामुळे तो मुख्यमंत्र्यांच्या गावी पोहचू शकला नाही. तो मुख्यमंत्र्यांच्या गावी कशासाठी जात होता हे ही समजले नाही . त्याच्यावरील गोळीबार प्रकरणानंतर त्याला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे पोलीस संरक्षणात व त्याच्या मोठ्या महागड्या दहा-बारा गाड्यांच्या ताफ्यात सलमान महाबळेश्वर येथे आला आहे.