वाई: नितीन पाटील यांना सातारा लोकसभा निवडणूक लढवावी लागेल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. आपल्याला जबाबदारी दिली तर ताकदीने लढावं लागेल. मात्र महायुतीमध्ये कुणालाही उमेदवारी मिळो जो उमेदवार उभा राहील त्याच्यासाठी ताकदीने काम करावे लागेल असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी
महाबळेश्वर येथे वाई विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार गट) कार्यकर्ता संवाद मेळावा एमपीजी मैदानावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, खंडाळा तालुक्याचे जेष्ठ नेते बकाजीराव पाटील, नितीन भरगुडे, उदय कबूले, प्रमोद शिंदे, दत्तानाना ढमाळ, राजेंद्र तांबे, आप्पासाहेब देशमुख, बाबुराव संकपाळ, राजेंद्र राजपुरे, संजय गायकवाड, किसनशेट शिंदे, प्रताप पवार आदी उपस्थित होते. प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मकरंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला,
हेही वाचा : सांगली: कर्नाटक सीमेवर ५ लाखांचा गुटखा जप्त
आमदार मकरंद पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली. अजित पवार व शरद पवार अशी पक्षाची विभागणी झाली. आपण काय भूमिका घ्यावी हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसमोर फार मोठा प्रश्न होता. लक्ष्मणराव पाटील यांच्यासह माझ्या कुटुंबाचे शरद पवारांसोबत फार जवळचे संबंध आहेत. सर्वांच्या सहकार्याने २००९ ला आमदार झाल्यापासून मागील पंधरा वर्षांत मतदारसंघ विकासासाठी ताकद देण्याचे काम अजित पवार यांनी केले. साताऱ्यातील सहा तालुक्यांचे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे अर्थ चक्र अवलंबून असलेल्या किसन वीर आणि खंडाळा हे दोन्ही साखर कारखाने आर्थिक दृष्ट्या अडचणीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे हाल सुरु आहेत. या कारखान्यांवर ४५० कोटीचे कर्ज होते ते पाच वर्षांत ९९५ कोटींवर गेलं. दोन्ही कारखाने वाचावेत ही लोकभावना होती. मतदार संघातील विकास कामे व दोन कारखाने वाचावेत यासाठीच अजित पवार यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला.
अनेक अडचणी असताना देखील आपल्या मतदार संघात दोन आठवड्यात तब्बल आठशे कोटी रुपयांचा निधी आपण मंजूर करून आणला. किल्ले प्रतापगड, क्षेत्र महाबळेश्वर सह, व्याघ्र प्रकल्प, लोणंद, खंडाळा व वाई तीन पाणी योजनांसाठी कोट्यवधींचा निधी एकाच बैठकीत आपण मंजूर करून आणला. किसन वीर व खंडाळा कारखान्यासाठी ४५५ कोटीची थकहमी ग दोनच दिवसांपूर्वी सुरूर ते प्रतापगड पायथ्यापर्यंतच्या महत्वाच्या या रस्त्यांसाठी हॅम्प मध्ये तब्बल तीनशे पंचाहत्तर कोटी रुपये मंजूर केले आहेत. कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणला हे महायुतीमध्ये सहभागामुळे झाले. या धावपळीत आपला संवाद कमी झाला होता.
हेही वाचा : “पापी पेट का सवाल…”, केंद्रीय यंत्रणांची बाजू घेत सुप्रिया सुळेंची पंतप्रधान मोदींवर टीका
नितीन पाटील यांना उमेदवारी मिळावी ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तसेच सांगितले आहे. मात्र पुढे काय निर्णय होईल हे बघू. मात्र अजित पवारांसह नेत्यांनी आपले अडचणीतील कारखाना कोट्यवधींची विकासकामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून ज्याला उमेदवारी मिळेल त्या उमेदवाराचं काम करावचं लागेल. जर उमेदवारी आपल्या पक्षाला आली पक्षाने जबाबदारी दिली तर मागे हाटून चालणार नाही. कुणालाही उमेदवारी मिळो आपण सर्वांनी महायुतीला जिंकवण्यासाठी तेवढ्याच ताकदीने लढवायची असल्याचे सांगितले. सध्या लोकसभेच्या तोंडावर अनेक चर्चा सुरु आहेत कार्यकर्ते संभ्रमामध्ये आहेत मात्र केंद्रामध्ये जेव्हा नेतृत्व ताकदवान असतं त्या नेतृत्वाकडे जाण्याचा जनतेचा कल असतो. देशामध्ये नरेंद्र मोदी सारखे खमके नेतृत्व आहे मात्र विरोधकांकडे देशाचं नेतृत्व करेल असा चेहराच नाही. राहुल गांधी यांचं नेतृत्व देशातील जनतेने स्वीकारलं नाही. त्यामुळे महायुती मागे उभे रहावे लागेल असे आमदार पाटील यांनी सांगितले. यावेळी अनेक जेष्ठ कार्यकर्त्यांची भाषणे झाली.