सातारा : महाबळेश्वरच्या कांदाटी खोऱ्यातील संवेदनशील क्षेत्रात डोंगरफोड सुरू असल्याचे उघड झाल्यानंतरही संबंधित ठेकेदारांना अभय मिळत असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर प्रशासनाने आज संबंधित डोंगरफोड, खाणी बंद करत पंचनामे सुरू केले असले, तरी या कामावरील यंत्रणा, वाहने आणि गौण खनिज जप्त करण्याची कारवाई टाळली आहे. कारवाईअभावी घटनास्थळावरून ही सर्व यंत्रणा गायब झाली आहे.
महाबळेश्वरच्या कांदाटी खोऱ्यात नवीन महाबळेश्वर प्रकल्पांतर्गत रस्ते आणि अन्य विकासाची कामे सुरू आहेत. यासाठी नेमलेल्या ठेकेदारांकडून या कामासाठी लागणाऱ्या दगड-मुरुम-खडीसाठी परिसरातील डोंगर फोडण्याचे प्रकार उघडकीस आले. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी याप्रकरणी चौकशी आदेश दिला आहे. हे प्रकरण गंभीर असून, दोषींवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच, याबद्दल पर्यावरणप्रेमींनीही संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, याबाबत प्रशासकीय पातळीवर कारवाई आज सुरू करण्यात आली. यासाठी चौकशी अधिकारी म्हणून प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आज या भागात सुरू करण्यात आलेली डोंगरफोड, खाणी बंद करण्यात आल्या आहेत. तसेच घटनास्थळाचा पंचनामा सुरू करण्यात आला आहे. मात्र, ही कारवाई होण्यापूर्वीच घटनास्थळी या डोंगरफोडीसाठी आणलेली वाहने, पोकलेन, जेसीबी, खडी बनविणारी यंत्रणा जागेवरून हटवण्यात आलेली आहे. ही सर्व वाहने, यंत्रणा, तसेच या डोंगर फोडीतून उत्खनन केलेले गौण खनिज यावर जप्तीची कारवाई करण्यात आलेली नाही. या कारवाईबाबत प्रशासनाकडून मौन बाळगले जात आहे. संबंधित ठेकेदार राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याने त्यांच्यावरील कारवाईबाबत टाळाटाळ होत असल्याचे बोलले जात आहे.
मागील अनेक महिन्यांपासून या परिसरात बेकायदारीत्या पोकलेन, जेसीबी लावून डोंगर फोडण्याचे काम सुरू होते. यासाठी कोणताही परवाना न घेता वेगवेगळ्या ठिकाणी विनापरवाना खाणी पाडण्यात आल्या होत्या. बेकायदा क्रशरही उभारण्यात आले होते. राजकीय दबावामुळे याला प्रशासनाकडूनही अभय मिळत असल्याचे स्थानिक सांगत आहेत. यातून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल तर बुडवण्यात आलाच, शिवाय पर्यावरण आणि जैवविविधतेची मोठी हानी करण्यात आली आहे.
महाबळेश्वरच्या कांदाटी खोऱ्यातील संवेदनशील क्षेत्रात डोंगरफोड सुरू असल्याचे उघड झाल्यानंतर प्रशासनाकडून आज संबंधित डोंगरफोड, खाणी बंद करत पंचनामा सुरू केला आहे. याबाबत चौकशी अहवाल तयार करून साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाईल.
राजेंद्र कचरे, प्रांताधिकारी