वाई : साताऱ्यातील राजपथावर आकर्षक झाडे लावण्यात आली आहेत. मध्यरात्री एका व्यापाऱ्याच्या फलकाला अडथळा ठरत असल्याने झाड तोडण्यात आल्याने झाड तोडणाऱ्यांबद्दल साताऱ्यात संताप व्यक्त करत हरित साताराच्या सदस्यांनी अभिनव आंदोलन केले. व्यापार करताय करा पण झाड तोडायचा ‘ उद्योग ‘ नको, आम्हीं म्हणतोय वाचवायचं, ‘ ह्यो ‘ म्हणतोय तोडायचं…असे फलक घेऊन रस्त्यावर उतरलेल्या सातारकरांनी आज राजपथावर मूक निदर्शने केली.

कमानी हौद जुना दवाखान्याच्या दरम्यान पालिकेने लावलेल्या झाडावर शनिवारी रात्री दोन अनोळखी तरुणांनी कोयता चालवत डेरेदार सावली देणारे झाड तोडण्याचा उद्योग केला. एका जागरूक नागरिकाने या कृत्याचे मोबाईलवर शूटिंग करण्यास सुरुवात केल्यानंतर संबंधिताने तिथून पळ काढला तथापि तोपर्यंत झाडाच्या निम्म्याहून अधिक फांद्या तोडल्या गेल्या होत्या. याबाबतची चित्रफीत ने समाज माध्यमावर प्रसिद्ध झाल्यानंतर संतप्त सातारकरांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

हेही वाचा…“छगन भुजबळांना काही दिवसांनी बैलाच्या गोळ्या द्याव्या लागणार, मोठं इंजेक्शन…”, मनोज जरांगेंचा संताप; म्हणाले, “कितीही आडवे या…”

अर्धवट तोडलेल्या झाडाचे जतन व्हावे या, बेकायदेशीरपणे झाडे तोडणाऱ्यांवर पालिकेने कडक कारवाई करावी, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांना आळा बसावा या हेतूने आज हरित सातारा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी झाडाजवळ विविध जागृती पर फलक हातात घेऊन मुक निदर्शने केली. यावेळी स्थानिक रहिवाशी व रिक्षा थांबा संघटनेचे सदस्य ही मुक आंदोलनात आंदोलनात सहभागी झाले होते.

सलग आलेल्या सार्वजनिक सुट्ट्या लक्षात घेऊन संबंधित व्यक्तीने झाड तोडण्याचा खोडसाळपणा केला. ही बाब पालिकेच्या निदर्शनास आणून देत असून नगरपालिकेने लावलेले झाड बेकायदेशीरपणे तोडणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी हरित साताराचे कार्यकर्ते उमेश खंडूजोडे व संजय मिरजकर यांनी केली .

हेही वाचा…“ओबीसींच्या आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही हे सांगा”, पंकजा मुंडेंनी सरकारला विचारला जाब; म्हणाल्या, “मराठा आरक्षणाला…”

या आंदोलनात हरित साताराचे संजय मिरजकर, उमेश खंडूजोडे, सुधीर सुकाळे, संजय झेपले अंकुश मांडवकर, दत्ता चाळके, दिलीप भोजने, निखिल घोरपडे, प्रकाश खटावकर, एका पाटील, सोना भोसले, साईराज पवार आदी सहभागी झाले होते.