तरडगाव: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावर पावसाचे सावट आले आहे. आज तरडगाव(तरडगाव) मुक्कामी पावसाने हजेरी लावल्याने लाखो वारकऱ्यांच्या निवासाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे सातारा प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे . साताऱ्यातील तरडगाव (ता फलटण) चांदोबाचा लिंब येथे आज मध्यम पावसात दुपारी साडेचार वाजता अलोट उत्साहात पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण पार पडले. लोणंद वरून अडीच दिवसांच्या मुक्कामानंतर पालखी सोहळा चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगण करून तरडगाव मुक्कामी आला. तोपर्यंत पालखी सोहळ्यावर पावसाचा जोरदार वर्षाव झाला. त्यामुळे दिंड्यांच्या मुक्कामातील राहुट्या साठी उभारलेल्या तंबूत पाणी शिरले. सगळीकडे चिखल झाला आहे.याच पावसात साडेसहा वाजता तळावर सर्व दिंड्या पोहोचल्या. पालखी तळावर चोपदारांनी दंड उंचावल्यावर सर्वत्र शांतता झाली. चोपदारांनी सूचना केल्या. समाज आरती पावसातच होऊन माऊली एक दिवसासाठी तरडगाव मुक्कामी विसावली. या पावसाने वारकऱ्यांच्या विश्रांतीमध्ये अडचण निर्माण झाली आहे. पावसाचा अंदाज न आल्याने वेळीच खबरदारी न घेतल्याने वारकऱ्यांना चिखलातच मुक्काम करावा लागणार आहे. गावातील व आजूबाजूच्या परिसरातील सर्व शाळा समाज मंदिरे, मंगल कार्यालये, ग्रामपंचायतच्या मिळकतीमध्ये वारकऱ्यांचा मुक्काम आहे. ज्या ग्रामस्थांच्या घरी मुक्काम करता येईल तिथे वारकरी मुक्काम करत आहेत. तरीही अनेक वारकरी जागे अभावी प्रशासनाच्या मदतीच्या आशेवर आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा