सातारा : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची हत्या केली. या भ्याड हल्ला प्रकरणाचा साताऱ्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला. या निषेधाची नोंद जिल्हा प्रशासनाकडे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली. या सकल हिंदू समाजाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनावर महेश शिवदे, विश्वास गोसावी, संतोष प्रभुणे, विक्रम बोराटे, अविनाश खर्शीकर, राहुल शिवनामे, वैशाली टंगसाळे, विजय गाढवे, विश्वास सावरकर, विकास गोसावी, विठ्ठल बलशेठवार यांच्या स्वाक्षरी आहेत.

या निवेदनात नमूद केले आहे की, जम्मू-काश्मीर येथे पहलगाम भागामध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला या घटनेचा हिंदू समाज म्हणून आम्ही निषेध करत आहोत. खेदाची गोष्ट आहे की त्यांनी नाव आणि धर्म विचारून त्यांची निर्घृण हत्या केली. वास्तविक पाहता संपूर्ण भारतात अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. जम्मू-काश्मीरच्या भागांमध्ये झालेला हा हल्ला भ्याड आहे. अतिरेक्यांना कोणता धर्म नसतो, असे सांगणाऱ्या सर्वांनी हे लक्षात घ्यावे की धर्म विचारून हिंदू असलेल्या पर्यटकांची हत्या करण्यात आली आहे.

अतिरेकी पुन्हा त्यांच्या जुन्या व घाणेरड्या संस्कारावर येऊन हिंदूंची हत्या करत आहेत. सत्तावीस पर्यटकांची हत्या झाली. अनेक पर्यटक जखमी झालेत, याही प्रकरणाचा आम्ही निषेध करत आहोत. सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निषेधाच्या घोषणा देत नंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले.

जिल्ह्यातील सात पर्यटक सुरक्षित

सातारा जिल्ह्यातून जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले सात नागरिक सध्या श्रीनगर येथे सुखरूप आहेत. पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागांत अडकलेले सातारा जिल्ह्यातील कोणतेही नागरिक तेथे अडकले असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या ०२१६२-२३२१७५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांनी केले आहे.