वाई : पोलीस भरतीतील उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्य सापडल्याने खळबळ उडाली. तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. उत्तेजक द्रव्य आणि औषधीं गोळ्यासह त्याला सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सातारा येथे मागील काही दिवसांपासून पोलीस भरती सूरु आहे. भारत राखीव बटालियनच्या पोलीस भरतीसाठी आलेल्या एका उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्य आणि गोळ्या सापडल्याने खळबळ उडाली आहे.दि २९ जून रोजी सकाळी मैदानी चाचणीपूर्वी धम्मानंद प्रकाश इंगळे (२४, रा. बोरगाव वसू, ता. चिखली, जि. बुलडाणा) असे उमेदवाराचे नाव आहे. येथील पोलीस शिपायांच्या रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. मैदानी आणि शारिरीक चाचणीसाठी अर्जदार उमेदवारांना बोलावण्यात आले आहे.

धम्मानंद इंगळे याच्यासह अन्य उमेदवारांची दि २९ जून रोजी मैदानी आणि शारिरीक चाचणी होती. या उमेदवारांना मैदानावर सोडण्यापूर्वी त्यांची तपासणी करण्यात येते. यानुसार पोलीस नाईक अन्सार इब्राहिम शेख हे अन्य पोलिसांसह प्रत्येक उमेदवारांची तपासणी करून त्यांना मैदानावर सोडत होते. यावेळी धम्मानंद याच्या बॅगेमध्ये डीओएक्सटी-एसएल ही एक टॅबलेट, टेझोविन कंपनीची ३० एमजीची तीन टॅबलेट, डेक्सोना कंपनीच्या २एमएलचे इंजेक्शनच्या चार बॉटल्स आढळून आले.

हेही वाचा : पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

या औषधी गोळ्या व इंजेक्शन उत्तेजक म्हणून गणले जातात. ही बाब पोलीस नाईक शेख आणि तेथील अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला त्याच्यासह ताब्यात घेतले. पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी पूर्वी या गोळ्या सेवन करून इंजेक्शन टोचून घेण्यासाठी त्याने स्वतःजवळ ठेवल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. याप्रकरणी नाईक शेख यांनी सातारा पोलीस ठाण्यात धम्मानंद इंगळे विरोधात तक्रार नोंदवली. पोलीस हवालदार गोर्डे या तपास करीत आहेत.