वाई : महाबळेश्वर पाचगणी येथे नाताळच्या सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक आणि त्यांच्या वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. वाहनांच्या गर्दीने या गिरींस्थळावर सर्वत्र वाहतूक कोंडी झाले असून अनेक पर्यटक गाड्यातच अडकले आहेत. सायंकाळी परतीच्या प्रवासातही अनेक वाहने वाहतूक कोंडीत अडकून पडली आहेत वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहे. नाताळ आणि विकेंडच्या सलग सुट्ट्यांमुळे सध्या महाबळेश्वर पाचगणी फुल्ल झाले आहे. महाबळेश्वर पाचगणीचे थंड अल्हाददायक वातावरणाची पर्यटनाची मजा लुटण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक पाचगणी महाबळेश्वरला आले आहेत.
येथील अरुंद रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने आल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. मागील कित्येक तास पर्यटक वाहनातच अडकले आहेत. नाताळाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या गर्दीने महाबळेश्वरच्या बाजारपेठासह प्रेक्षणीय पॉईंट्स पर्यटकांनी गजबजले आहेत. संध्याकाळी पाचगणी, महाबळेश्वरच्या बाजारपेठा फुलत आहेत. या परिसरात हलकी वाहने मोठ्या संख्येने आल्याने सर्वत्र वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पर्यटक मिळेल त्या ठिकाणी गाडी पार्क करत आहेत. मोठ्या संख्येने वाहने आल्याने पर्यटनाची मजा घेण्यात अडचण येत आहे.
हेही वाचा : “मनोज जरांगेचा अजून अण्णा हजारे झालेला नाही”, डॉ. कुमार सप्तर्षी यांची टिप्पणी
वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात दुपारी दीड तास वाहतूक बंद होती. अनेक वाहने बंद पडल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. हजारो वाहनांची चाके जागेवरच थांबल्याने घाटात पाचगणी व वाईपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सद्या पाचगणी व महाबळेश्वरकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. परतीच्या प्रवासाला निघालेल्या पर्यटकांची संख्या ही मोठी आहे. शनिवारी सकाळपासूनच या पर्यटनस्थळांवर पर्यटकांची रेलचेल सुरू झाली आहे. दुपारी दीड वाजता हॅरीसन फॉलीपासून जवळच असलेल्या एका वळणावर शैक्षणिक सहल घेऊन महाबळेश्वरच्या दिशेने निघालेली आराम बस बंद पडली. त्यामुळे वाई व पाचगणीच्या दिशेने जाणारी वाहने जागेवरच थांबली. दोन्ही बाजूला सुमारे चार किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांची रांग लागली असून, वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे