वाई: वेचले (ता. सातारा) गावात शेताकडे सोयाबीनच्या पेरणीसाठी जात असताना रस्त्याच्या कडेच्या विद्युत जनित्राचा प्रवाह पाण्यात उतरल्याने विजेचा धक्का लागून दोन बैलांचा मृत्यू झाला. वेचले (ता. सातारा) गावात चाहूर शिवारातील गोरख काटकर, राजेंद्र लोंढे, परबती भोसले हे आपल्या शेताकडे सोयाबीनच्या पेरणीसाठी सकाळी बैलगाडीतून जात होते.
या वेळी शिवारातील रस्त्याकडेला आसणाऱ्या विद्युत जनित्राचा (डीपी) वीज प्रवाह तांत्रिक अडचणीमुळे रस्त्यामध्ये साठलेल्या पाण्यात पसरला होता. त्यावेळी रस्त्यावरून बैलगाडी जाताना एका बैलाचा पाय त्या पाण्यात पडताच बैलाला विजेचा धक्का बसला आणि क्षणात दोन्ही बैल विद्युत जनीत्राकडे खेचले गेले. बैलगाडी शेजारील दगडावरुन पलटी होवून बैलगाडीतील तीघे जण खाली फेकले गेले आणि बैलगाडी पलटी झाली. त्यामुळे ते वाचले.
हेही वाचा : सांगली: प्रेमी युगुलाची गळफास लावून आत्महत्या
सर्जा राजा नावाच्या बैलांनी आपल्या मालकावरील संकट आपल्यावर घेवून मालकाचे प्राण वाचविले. घटना स्थळी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी घेराव घालून शेतकऱ्याचे झाले नुकसान भरपाई देवू असे लेखी आश्वासन घेतले. वटपौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.