सावंतवाडी : दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथे हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा आज मंगळवारी सकाळी मृत्यू झाला आहे. फणस काढण्यासाठी सकाळी ७ वाजता शेतकरी लक्ष्मण गवस- (वय ७० वर्षे) शेतीत गेले होते. मागुन हत्तीने हल्ला केला. हत्तीच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २५ वर्षांपासून हत्तींचा वावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात आहे.

शेती बागायतीची कोट्यावधी रुपयांची नुकसानी केली. तसेच माणसावर हल्ले देखील केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेले हत्ती कर्नाटक राज्यातील दांडेली अभयारण्यातून दोडामार्ग तालुक्यात आले आहेत. ते सावंतवाडी तालुक्यातील आंबोली, दोडामार्ग तालुक्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात धुमाकूळ घालत आहेत.

फणस व काजू पीक परिपक्व झाले आहे. त्या खाद्यासाठी हत्ती सध्या कोलझर, मोर्ले भागात आहेत. फणस व काजू बोंडे खाण्यासाठी हत्ती मोर्ले येथे आले आहेत. शेतकरी फणस काढण्यासाठी गेला असताना हत्तीने हल्ला केला आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या शिष्टमंडळाने हत्ती पकड मोहीम हाती घ्यावी म्हणून नुकतेच लक्ष वेधले होते.

दोडामार्ग तालुक्यातील लोकांनी हत्ती पकड मोहीम हाती घ्यावी अशी मागणी लावून धरली आहे पण राज्यकर्ते याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने शेतकरी व बागायतदार मेटाकुटीला आले आहेत. दरम्यान उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांना संपर्क साधला असता ते म्हणाले, शेतकऱ्यावर हत्तीने हल्ला चढवला असल्याची माहिती आहे. त्याबाबत घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेत आहोत.