सावंतवाडी : बेळगांव (कर्नाटक) जिल्ह्यातील खानापूर येथे जंगली हत्तींचा धुमाकूळ सुरू झाल्यावर तेथे पकड मोहीम हाती घेतली जाते. तर महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग व कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या हत्तींना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याबाबत वन विभाग नन्नाचा पाडा लावत आहे. हत्ती पकडण्यास केंद्र सरकारने बंदी घातली आहे असे सांगणारे वन विभाग उघडे पडले आहे. आता हि मोहीम केव्हा हाती घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बेळगाव खानापूर तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या जंगली टस्कर हत्तीला वन विभागाने प्रशिक्षित हत्तीच्या माध्यमातून सहा तासात जेरबंद केले. महाराष्ट्र राज्यातील दोडामार्ग तालुक्यातील जंगली हत्ती पकड मोहीम बाबत शेतकऱ्यांत गैरसमज पसरविला जात आहे.
कर्नाटक राज्यातून दोडामार्ग तालुक्यात दाखल झालेल्या जंगली हत्ती कळपाकडून गेल्या २३ वर्षापासून दोडामार्ग , कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा, येथे धुमाकूळ सुरू आहे. तर दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील अनेक गावात एका टस्कर हत्तीचा धुमाकूळ सुरू आहे. पण वन अधिकारी दूर्लक्ष करत आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात दांडेली (कर्नाटक) अभयारण्यातून आलेल्या जंगली टस्कर हत्तीला कर्नाटक वन अधिकारी प्रशिक्षित हत्ती, माहुत यांनी अवघ्या सहा तासात पकडून सकरबैल शिमोगा कर्नाटक येथे अभयारण्यात पाठवले. मग दोडामार्ग तालुक्यातील जंगली हत्ती पकड मोहीम बाबत हत्ती पकड मोहीमेला केंद्र सरकारने बंदी घातली आहे, अशी चूकीची माहिती का दिली जाते? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील अनेक गावात जंगली हत्ती कळपाकडून शेतकरी बांधवांना देशोधडीला लावले पण हत्ती पकडून त्यांना पुन्हा कर्नाटक मध्ये पाठवा अशी मागणी केली जात आहे. पण माणगाव खोऱ्यातील पकड मोहीम दरम्यान दोन हत्ती मरण पावले. यामुळे हत्ती पकड मोहिमेला केंद्र सरकारने बंदी घातली यामुळे मोहीम राबवता येत नाही. अशी दिशाभूल करणारी माहिती कशी दिली. जर हत्ती पकडण्यास बंदी आहे. तर मग गुरूवारी बेळगाव खानापूर येथे धुमाकूळ घालणाऱ्या जंगली टस्कर हत्तीला सहा तासात पकडून अभयारण्यात दाखल कसे केले? याचे उत्तर सिंधुदुर्ग जिल्हा उपवनसंरक्षक अधिकारी देणार आहेत का ? असा प्रश्न उपस्थित करत आहेत.
मांगेली, कणकुबी, जवळ असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या सुळेधारी टस्कर हत्तीसह नऊ हत्तींचा स्वतंत्र कळप तालुक्यात दाखल झाला होता. सध्या हा कळप दांडेली अभयारण्याच्या परतीच्या मार्गावर आहे. तथापि हा टस्कर त्या कळपातून बाहेर पडून खानापूर तालुक्यातच स्थिरावला होता. नऊ महिन्यांच्या काळात त्याने तालुक्यातील ऊस व भात पिकाचे नुकसान चालविले होते. त्यामुळे, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसला होता. हत्तीची मजल लोकवस्तीपर्यंत पोहचली होती. त्यामुळे, सहजीवन स्वीकारलेल्या या टस्कराला पकडण्यात वन खात्याला फारसे प्रयास पडले नाहीत. तालुक्याबाहेर स्थलांतर करण्यात वन खात्याला गुरुवारी ९ जानेवारी रोजी यश आले. शिमोगा व नागरहोळे अभयारण्यातील वन्यजीव तज्ज्ञ, चार प्रशिक्षित हत्ती आणि अनुभवी माहुतांच्या मदतीने राबविलेली ही मोहीम सहा तास चालली. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या नाराजीचा सामना करणाऱ्या वन खात्याच्या अधिकाऱ्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला.
हेही वाचा : “सर्वसामान्यांसाठी राज्यात परवडणारे घरी उभारण्याचा आमचा अजेंडा”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
आठ दिवसांपूर्वी वन्यजीव विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी खानापुरातील उपद्रवी हत्तीला पकडण्याचे आदेश दिले होते. त्यासाठीची आवश्यक तयारी स्थानिक अधिकाऱ्यांनी आठ दिवसांपासून चालविली होती. बुधवारी ८ जानेवारी रोजी सकरबैलमधून जि. शिमोगा) चार प्रशिक्षित हत्ती आणि माहूत खानापुरात दाखल झाले. गुरुवारी सकाळी सातपासून टस्कराचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. त्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेण्यात आली. शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जळगे गावाजवळील जंगलात तो दिसून आला. यावेळी वन्यजीव तज्ज्ञ डॉ. सुरेश यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने त्याला बेशुद्ध करण्याची कामगिरी बजावली.
डार्ट गनच्या साहाय्याने टस्कराला बेशुद्धीचे इंजेक्शन देण्यात आले. त्याच्या समोरील व मागील पायाला दोरखंड बांधून ते प्रशिक्षित हत्तींच्या पायांना बांधण्यात आले. प्रशिक्षित हत्तींच्या मदतीने टस्कराला मोकळ्या जागेत आणण्यात आले. चार प्रशिक्षित हत्तींचे टस्कराभोवती कडे तयार करून क्रेनच्या पट्ट्यांनी त्याला बांधण्यात आले. क्रेनच्या साहाय्याने टस्कराला ट्रकमध्ये उचलून ठेवण्यात आले. मुख्य वनसंरक्षक मंजुनाथ चव्हाण, जिल्हा वनाधिकारी मारिया ख्रिस्तू राजा डी., एसीएफ सुनीता निंबरगी, आरएफओ श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी व बघ्यांनी एकच गर्दी केली होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली. टस्कराला सकरेबैल हत्ती अभयारण्यात पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
दोडामार्ग तालुका सीमेवर असलेल्या कर्नाटक खानापूर तालुक्यात जंगली टस्कर हत्तीला सहा तासात तेथील वन अधिकारी पकडू शकतात तर दोडामार्ग चंदगड, आजरा, सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्ह्यातील जंगली हत्ती पकड मोहीम बाबत शेतकऱ्यांना चूकीची माहिती देऊन दिशाभूल का? केली जात आहे, जर हत्ती पकड मोहीम केंद्र सरकारने बंदी घातली आहे. तर मग खानापूर तालुक्यात ही मोहीम कशी राबवली. असा सवाल संतप्त शेतकरी करत आहेत. कर्नाटक सरकार वन अधिकारी जंगली टस्कर हत्ती पकड मोहीम यशस्वी करतात मग महाराष्ट्र सरकार, वन विभाग २३ वर्षे फक्त शेतकरी देशोधडीला लागतील अशी वाट पाहत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.