सावंतवाडी : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्या विरोधात एका अज्ञात व्यक्तीने “आता बदल हवो तर आमदार नवो”, या मथळ्याखाली बॅनर झळकवले आहेत. या विरोधात शिवसेना (शिंदे गट) आक्रमक भूमिकेत असून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी निवेदन सादर केले आहे. “आता बदल हवो तर आमदार नवो”, या मथळ्याखाली सावंतवाडीचे स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गेल्या काही वर्षांत केलेल्या विकासात्मक घोषणांच्या विरोधात सावंतवाडी शहरासह मतदारसंघात काही ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरच्या विरोधात आक्रमक झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात धडक देत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. दीपक केसरकर शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते असून त्यांची यापुढे अशा रीतीने बदनामी कोणाकडून होत असेल तर शिवसेना पक्ष कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.

याबाबतचे निवेदन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांना सादर केले. यावेळी महिला आघाडी प्रमुख ॲड. नीता कवीटकर, उपजिल्हाप्रमुख विनायक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, माजी नगराध्यक्षा अनारोजीन लोबो, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, उपतालुकाप्रमुख गजानन नाटेकर आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर! ‘या’ दिवशी दोन महिन्यांचे एकत्रच पैसे मिळणार; अजित पवारांची माहिती

शिवसेना आक्रमक झालेल्या बॅनरमध्ये नेमके काय?

सावंतवाडी शहरातील मोक्याच्या ठिकाणी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात बॅनर झळकल्याचे बुधवारी सकाळी निदर्शनास आले. या बॅनर मध्ये “बदल हवो तर आमदार नवो” अशा मालवणी भाषेतील मथळ्याखाली दीपक केसरकर यांनी गेल्या पंधरा वर्षात केलेल्या विविध प्रकल्पांच्या घोषणा व त्याबाबतची सद्यस्थिती याचे वर्णन करण्यात आले आहे. चष्म्याचा कारखाना, सेट टॉप बॉक्स कारखाना, टॉय ट्रेन, नरेंद्र डोंगरावरील ट्री हाऊस, सावंतवाडी टर्मिनस, ताज हॉटेल यासारख्या मुद्द्यांना स्पर्श करीत त्याबाबतचा लेखाजोखा या बॅनरद्वारे मांडण्यात आला आहे. स्थानिक बेरोजगार युवकांची झालेली फसवणूक व आता जर्मनीत नोकरी लावण्याचे देण्यात आलेले नवे आश्वासन याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. तर कथित दहशतवादाविरोधातील केसरकर यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. यापूर्वीही अशाच आशयाचे काही बॅनर सावंतवाडी शहरासह मतदारसंघात लावण्यात आले होते. त्यामुळे आता लावण्यात आलेल्या बॅनरच्या माध्यमातून पुन्हा एकदा मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची चर्चा सुरू आहे.