सिंधुदुर्ग: पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या कारमधील व्यक्तीला वाचवताना वाचविणारेच पुराच्या पाण्यात फसल्याची घटना भल्या पहाटे दोडामार्ग तालुक्यातील भेडशी पुलावर घडली. या बचाव कार्यात सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे. दोडामार्ग तालुक्यातील सर्व नदी नाले दुथडी भरून वाहत असून आज गुरुवारी भल्या पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास भेडशी पुलावर पाणी आलेले असताना सदर पुलावर कार घेऊन जाताना कार वाहून गेल्याने दोन युवक कारमध्ये अडकून पडले होते , त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
याबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलीस हवालदार विठोबा सावंत, श्री.सुतार, श्री.पोशी , श्री.अनिल कांबळे असे तत्काळ लाईफ जॅकेट, दोर, रिंग अशी साहित्य घेऊन घटनास्थळ भेडशी जुना पूल येथे पोहोचले. सदर ठिकाणी एक कार व त्याच्या पाठीमागे जीप गाडी पाण्यामध्ये बुडालेल्या स्थितीत दिसून येत होती. सदर कारमध्ये दोन युवक हे अडकून होते. सदर पुराच्या पाण्याचा प्रवाहाचा वेग फार जास्त असल्या कारणामुळे भेडशी वरच्या पुलावरील रस्त्यावर ते गेले. तेथे पोलीस हवालदार विठोबा सावंत यांनी धाडसाने स्वतः रिंग घेऊन पुराच्या पाण्यात उतरून त्यांनी दोर सदर बुडणाऱ्या इसमांकडे फेकला. त्यांनी तो दोर कारला बांधला, व दोघांना वाचविण्यात यश आले आहे.
पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांची नावे मशनु गंगाराम कांबळे (वय ३० वर्षे, राहणार- रवळनाथ मंदिर जवळ, आसगाव, नांदोडे, तालुका चंदगड) दुसरा ज्ञानेश्वर नागोजी हळवनकर (वय २५ वर्षे, राहणार – रवळनाथ मंदिर जवळ,आसगव, नांदोडे, तालुका- चंदगड) अशी आहेत. सदर घटनेबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, समोर असलेल्या कार चालकाने कार पुराच्या पाण्यात घातली. तिथून कार काढताना ती कार पाण्यात अडकली व बुडू लागली. कारमधील दोघांना वाचवण्यासाठी आम्ही आमची जीप पुराच्या पाण्यात घातली व सदर कारमधील इसमांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यास मदत केली. तेवढ्यात पाण्याचा ओघ अचानक वाढल्याने आम्ही पुराच्या पाण्यात अडकलो.
हेही वाचा : Maharashtra Rain News: सावधान…पाऊस पुन्हा परतला, आता ‘या’ भागात मुसळधार…
दरम्यान, सर्वांना सुखरूप बाहेर काढले असून कार मालकाचे नाव मारकुंद सुखविंदर सिंग त्यागी (रा. गाजियाबाद, युपी) असे सांगितले. त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, त्यांनी कार पुलावर घातल्यानंतर अचानक पाणी वाढले व ते पाण्यात अडकले होते असे दोडामार्ग पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी सांगितले.