सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या पाणबुडी प्रकल्पासाठी ४३ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने मंजूर केला आहे, त्यामुळे गेले काही वर्ष रखडलेला वेंगुर्ले निवती समुद्रातील प्रस्ताविक पाणबुडी प्रकल्प मार्गी लागेल अशी अपेक्षा करण्यात येत आहे. सन २०१८-१९ च्या राज्य अर्थसंकल्पात सिंधुदुर्गासाठी पहिल्या पाणबुडी प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली होती. त्यासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी मिळणार होता. सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ले निवती रॉक जवळ समुद्रात पाणबुडी प्रकल्प होणार होता.
या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटकांना खोल समुद्राच्या पाण्यातील अंतरंग अनुभवता आला असता, समुद्रातील अंतरंगात असलेला खजिना यामुळे न्याहाळत सफर झाली असती. आता केंद्र सरकारने निधी दिला असल्याने पर्यटन प्रेमींच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. साधारण वीस ते पंचवीस व्यक्ती पाणबुडीमध्ये बसून समुद्राखाली जाऊन समुद्राखालील अंतरंग बसून न्याहाळू शकतात. कोकणात सर्वात जास्त कोरल्स, रंगबिरंगी मासे आणि समुद्राच्या आतील अंतरंग दिसणारे अनोखे विश्व हे फक्त वेंगुर्ल्यातील निवती रॉक या ठिकाणी असून हे अनेक सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे हा प्रकल्प निवती समुद्रात होणार आहे.
महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारने कोकणातील या प्रकल्पाला ४३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र सरकारने तशी घोषणाही केली. परंतु पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी सरकारने पावले उचलली नाहीत. समुद्र किनारी पर्यटन स्थळे विकसित झाली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ शकतात, म्हणून पाणबुडी प्रकल्पाला महत्त्व आले आहे.