सावंतवाडी : मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडील जनहीत याचिका मधील आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण दोडामार्ग तालुक्यात व सावंतवाडी तालुक्यातील एकूण १३ गावांमध्ये वृक्षतोडीस बंदी घातली असल्याची माहिती सावंतवाडी दोडामार्ग टास्क फोर्स समिती तथा सहाय्यक वनसंरक्षक, सदस्य सचिव वैभव बोराटे यांनी दिली आहे.
अवैधरित्या होणाऱ्या वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सावंतवाडी – दोडामार्ग Task Force समिती तयार करण्यात आलेली आहे. या समिती मध्ये महसूल विभाग, वन विभाग व पोलीस विभाग मधील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सावंवाडी – दोडामार्ग Task Force समितीचे अध्यक्ष हे उपविभागीय अधिकारी सावंतवाडी असून सदस्य सचिव सहाय्यक वनसंरक्षक हे आहेत. त्याचबरोबर या समितीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार सावंतवाडी, दोडामार्ग हे सदस्य आहेत. ही समिती उच्च न्यायालयाकडील आदेशानुसार वृक्षतोडीस प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये संबंधित विभागांनी वृक्षतोडीस प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने केलेली कार्यवाही, प्रचार- प्रसिध्दी व प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा दरमहा आढावा घेतला जातो.
सावंतवाडी- दोडामार्ग Task Force समितीने ठरविलेप्रमाणे, दोडामार्ग तालुक्यात कोठेही गावात खासगी- मालकी, शासकीय क्षेत्रात वृक्षतोड झालेली किंवा वृक्षतोड होताना निदर्शनास आल्यास या घटनेबाबत जनतेने गावातील पोलीस पाटील, वनरक्षक, तलाठी यापैकी कोणालाही तातडीने कळविण्यात यावे. जेणे करुन वनविभागाकडील अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी जावून तात्काळ चौकशी करुन आवश्यक ती कार्यवाही करतील. तसेच अशा चौकशी प्रकरणामध्ये शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर नागरीकांनी आवश्यक ते सहकार्य करण्यात यावे. या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये वृक्षतोड प्रकरणी महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनीयमन) अधिनियम १९६४ अन्वये कडक कारवाई करण्यात येईल. वृक्षतोडबाबत ऑनलाईन तक्रारीसाठी सावंतवाडी दोडामार्ग Task Force समितीच्या sdtfsawantwadi@gmail.com या ईमेल आयडी वर आणि वन विभाग सावंतवाडी ०२३६३-२७२००५ यांच्याकडे दूरध्वनीव्दारेही वृक्षतोडीच्या घटनाबाबत तक्रार दाखल करु शकता,असे त्यांनी म्हटले आहे.