सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्णतेच्या त्रासापासून विद्यार्थ्यांचा बचाव होण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी सकाळी शाळा भरविण्याचा निर्णय घेतला आहे, तर प्राथमिक शाळांचा वेळ पंधरा दिवसांनी बदलणार आहे. लहान मुलांना उष्णतेचा त्रास होत असूनही प्राथमिक शिक्षणाधिकारी सुशेगाद असल्याचे पालक वर्गातून बोलले जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तापमान वाढत आहे. उष्णतेच्या तीव्र झळा बसत आहेत. त्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांनी १ मार्च पासून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांचा शाळेचा वेळ बदलला आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांना सकाळी ७. ३० वाजता शाळा भरवून दुपारी १२ वाजेपर्यंत शाळा सोडण्याचा वेळ दिला आहे.
दरम्यान प्राथमिक शाळा फक्त शनिवारी सकाळी ७.२० वाजता भरून सकाळी ११ वाजता सुटते आणि सोमवार ते शुक्रवार या दरम्यान शाळा १०.२० वाजता भरून ४. ३० वाजता सुटते. येत्या दि.१६ मार्च पासून प्राथमिक शाळा वेळ सकाळी करण्यात येणार आहे असे गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी म्हटले आहे.
प्राथमिक शाळेतील विद्यार्थी वयाने लहान तर माध्यमिक शाळांतील विद्यार्थी वयाने मोठे आहेत. त्यामुळे वयाने लहान असणाऱ्या मुलांची शाळा सकाळच्या सत्रात भरली पाहिजे, असे काही पालकांनी मत व्यक्त केले.
माध्यमिक शिक्षण विभागाने उष्णतेचा तीव्र झळा बसत असल्याने माध्यमिक शाळा १ मार्च पासून ७. ३० वाजता भरून दुपारी १२ वाजता सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून शाळांनी अंमलबजावणी सुरु केली आहे. तर प्राथमिक शिक्षण विभागाने उष्णतेचा तीव्र झळा बसत असूनही पंधरा दिवस उशीराने प्राथमिक शाळा वेळ सकाळी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्णता वाढली आहे. सर्वांना उष्णतेचे चटके बसत आहेत. मात्र माध्यमिक आणि प्राथमिक शाळांचा वेळ मात्र विसंगत ठेवला आहे. प्रशासन, प्राथमिक शिक्षण विभाग सुशेगाद असल्याचे पालक वर्गातून बोलले जात आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी प्राथमिक शिक्षण विभागाचा कारभार सुशेगाद आहे का? ते तपासावे अशी मागणी पालकांनी केली आहे.