सावंतवाडी : सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असतानाच सावंतवाडी येथील एकीला सायबर ठगांनी गंडा घातला आहे. या १.२६ लाखांचा गंडा घालणाऱ्या सायबर ठगांच्या विरोधात सायबर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत ई तक्रार दाखल झाली असून पोलीस चौकशी सुरू झाली आहे, याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे,असे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले.
सावंतवाडी येथील मीनाक्षी अळवणी यांना सायबर ठगांनी १.२६ लाखांचा गंडा घातला. २५ नोव्हेंबरला सकाळी त्यांना फोन आला . सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासविले. यानंतर बनावट चौकशी तब्बल २५ तास सुरू होती, तीही ऑनलाईन होती. या प्रकरणी त्यांना मानसिक धक्का बसला असून त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
या सायबर गुन्ह्यांमध्ये अळवणी यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे सीबीआय अधिकारी असल्याचे भासविले. व्हिडिओ कॉल द्वारे त्यांना सांगण्यात आले की त्यांच्या एचडीएफसी बँकेतील खात्यातील ६० कोटीच्या अनधिकृत व्यवहारांचा तपास सुरू आहे जो मनी लॉंन्ड्रीगशी संबंधित आहे. सीबीआयचे अधिकारी असल्याच्या आवेशात बोलताना त्यांनी या प्रकरणात अळवणी यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे असे सांगितले. त्यामुळे चौकशीला सामोरे जा, नाही तर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असे भासवून व्हिडिओ कॉल द्वारे सीबीआयच्या गोपनीय कराराची प्रत दाखवली. या कराराचे वाचन करून त्यांना असे भासवत चौकशी सुरू आहे आणि तुमच्या सहकार्याशिवाय ती पूर्ण होणार नाही.या चौकशीनंतर त्या निर्दोष असल्याचे स्पष्ट होईल. परंतु उच्च न्यायालयात खटला सुरूच राहील वित्तीय फसवणूक चौकशीचे नाटक करत ठगांनी अळवणी यांच्याकडून १.२६ लाख उकळले.
यानंतर अळवणी यांनी सायबर ठगांच्या सततच्या दबावाखाली १.२६ लाख रक्कम हस्तांतरित केली. यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले तेव्हा सिंधुदुर्ग सायबर क्राईम विभागाकडे तक्रार नोंदवली. या ऑनलाईन तक्रारीची दखल घेऊन १.२६ लाख रुपये रोखण्यासाठी पोलिस, सायबर पोलीसांनी प्रयत्न केला आहे. आता या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील चौकशी, कारवाई केली जाईल असे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले.