सोलापूर : दत्तात्रेयाचे अवतार मानले गेलेल्या अक्कलकोटनिवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांचा १६८ वा प्रकटदिन सोहळा बुधवारी मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. अक्कलकोटमध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. पहाटेपासून वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारच्या प्रखर उन्हातही भाविकांची स्वामी दर्शनाची ओढ कायम होती.
पहाटे मंदिरात श्री स्वामी महाराजांच्या काकड आरतीने श्रींच्या प्रकट दिन सोहळ्यास प्रारंभ झाला. श्री स्वामी समर्थ सेवासार संघाच्यावतीने श्री स्वामी समर्थांना फळ व मिठाईंचे ५६ भोग नैवेद्य अर्पण करण्यात आले. ज्योतिबा मंडपात भजन व नामस्मरण सोहळा झाल्यानंतर हजारो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्रींचा पाळणा सोहळा संपन्न झाला. मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे व अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले आणि प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते श्रींची आरती झाली. याचवेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंदिरात धाव घेऊन दर्शन घेतले. सर्व स्वामी भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आला. भाविकांच्यावतीने होणाऱ्या संकल्पित अन्नदानाच्या माध्यमातून दुपारी देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रस्त्यावरील देवस्थानच्या भक्त निवास भोजनकक्षात स्वामी भक्तांना महाप्रसाद देण्यात आला. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर देवस्थानच्या दक्षिण महाद्वारालगत दर्शन रांगेत कापडी मंडपासह पाणपोई आणि शीतपेयांची व्यवस्था करण्यात आली होती.
हेही वाचा…पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा, म्हणाले “इंडिया आघाडीला त्यांच्या पापाची शिक्षा…”
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातही श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींचा पाळणा आणि महाआरती झाली. यावेळी मंडळाचे सचिव शाम मोरे, उपाध्यअक्ष अभय खोबरे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि विश्वस्त उपस्थित होते.