सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात ३२ पैकी ९ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे २१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर माढा मतदारसंघात ६ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ३२ उमेदवारांमध्ये अंतिम लढत होणार आहे. उमेदवारी माघार घेतलेल्यांमध्ये सोलापुरातील वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड तर माढ्यात शेकापचे बंडखोर ॲड. सचिन देशमुख यांचा प्रामुख्याने समावेश आहे. सोलापुरात भाजपचे राम सातपुते आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यासह बहुजन समाज पार्टीचे बबलू गायकवाड यांची लढत होणार असून गायकवाड यांनी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मागितला आहे. भाजपच्या विरोधात बंडखोरी करून यशवंत सेनेतर्फे उभे राहिलेले संजय क्षीरसागर यांच्यासह अन्य बहुसंख्य उमेदवार अपक्ष आहेत. प्रमुख लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये होणार असल्याचे चित्र दिसत असले तरी बसपाला वंचित बहुजन आघाडीचे समर्थन मिळाल्यास तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट झाली नाही.
हेही वाचा : सांगली: कायदेशीर पूर्तता नसल्याने शेडबाळ मठाचा हत्ती वन विभागाने घेतला ताब्यात
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील या दोन्ही तुल्यबळ उमेदवारांसह वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारसकर, शिवसेना उध्दव ठाकरे गटाविरूध्दचे बंडखोर प्रा. लक्ष्मण हाके आदी ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्यामुळे मतदानासाठी प्रत्येक मतदान केंद्रात तीन मतदान यंत्रांची व्यवस्था करावी लागणार आहे. माढा मतदारसंघात एकूण १९ लाख ९६ हजार १०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात १० लाख ३२ हजार ६७० पुरूष तर ९ लाख ५५ हजार ७०६ आणि इतर ७० यांचा समावेश आहे. या मतदारसंघात १८ मतदान केंद्रे संवेदनशील असून यात माणमध्ये सर्वाधिक ९ मतदान केंद्रे करमाळ्यातील आहेत. तर ५ मतदान केंद्रे माण येथील आहेत. फलटण-२ आणि माढा व सांगोल्यात प्रत्येकी १ मतदान केंद्र संवेदनशील आहे. मोहिते-पाटील यांचे प्राबल्य असलेल्या माळशिरस तालुक्यात एकही मतदान केंद्र संवेदनशील नाही. निवडणूक अधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी ही माहिती दिली.