सोलापूर : राज्यात बीड, परभणीसारख्या भागात बेदम मारहाण आणि निर्घृण हत्यांचे प्रकार सोलापूर जिल्ह्यातही घडत आहेत. माळशिरस तालुक्यात पिलीव येथे एका तरुणाला विवस्त्र करून त्याच्या शरीरावर तापविलेल्या लोखंडी सळईने चटके देण्यात आले. यात त्याचा मृत्यू झाला. आकाश अंकुश खुर्द (वय २८, रा. पिलीव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृतदेहाजवळच त्याची दुचाकी आढळून आली.
याबाबत मृत आकाशची आई अनिता अंकुश खुर्द यांनी माळशिरस पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आकाश खुर्द हा रात्री घरातून बाहेर पडला होता. नंतर तो घरी परतला नाही. मात्र पिलीव ते चांदापुरी रस्त्यावर वनखात्याच्या जमिनीजवळ रस्त्यालगत त्याचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला. त्यांच्या पाठीवर व अन्य ठिकाणी लोखंडी सळईने चटके देण्यात आले होते. त्याच्या पाठीवर, मांडीवर, दोन्ही हातापायांवर, मांडीवर, पोटावर बेदम मारहाण केल्याच्या खुणा आढळल्या. हा निर्घृण खून कोणी आणि कशासाठी केला याचा उलगडा लगेचच झाला नाही. दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून एका तरुणीसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.