सोलापूर : वडिलोपार्जित घरजागेच्या वाटणीच्या कारणावरून भावकीमध्ये झालेल्या वादातून एका चहा कॅन्टीनचालकावर सशस्त्र प्राणघातक हल्ला केला तसेच त्यांचे प्राण वाचविण्यासाठी धावून आलेल्या इतरांवरही सशस्त्र हल्ला केल्याबद्दल बापासह तीन मुलांना सोलापूरच्या सत्र न्यायालयाने दोषी धरून प्रत्येकी पाच वर्षे सक्तमजुरीसह दंडाची शिक्षा ठोठावली. जखमीला नुकसान भरपाईपोटी आरोपींनी एक लाख २० हजार रूपये अदा करण्याचा आदेशही न्यायालयाने फर्मावला आहे.
जहाँगीर लालसाहेब सिंदगीकर (वय ५४) आणि त्याची मुले अब्दुल्लाह सिंदगीकर (वय २५), जैद सिंदगीकर (वय २९) आणि अबुबकर सिंदगीकर (वय २७, मुल्लाबाबा टेकडी,सिध्देश्वर पेठ, सोलापूर) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या चौघा बापलेकांची नावे आहेत. जिल्हा सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी या खटल्याचा निकाल सुनावला.
हेही वाचा : सांगली : होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश
आरोपी जहाँगीर सिंदगीकर आणि त्याच्या भावकीतील चहा कॕन्टीनचालक बंदगी हुसेनबाशा सिंदगीकर (वय ३५, रा. बसवेश्वर नगर, नई जिंदगी चौक, सोलापूर) यांच्यात वडिलोपार्जित घरजागेच्या वाटणीवरून वाद होता. १३ सप्टेंबर २०२१ रोजी आरोपी जहाँगीर याच्या घरात उभयतांची बैठक होऊन त्यात घरजागा वाटणीवर चर्चा झाली. परंतु त्यातून वाद झाला होता. नंतर बंदगी सिंदगीकर हे आपल्या एका नातेवाईकाच्या निधनानंतर दहाव्या दिवसाच्या विधीसाठी हजर राहण्याकरिता जात असताना पुन्हा आरोपी जहाँगीर याने वाद घातला. त्यातूनच संतापलेल्या जहाँगीर याने, बंदगी याचा खून करण्यासाठी आपल्या तिन्ही मुलांना चिथावणी दिली. तेव्हा चौघा बापलेकांनी मिळून बंदगी यांच्यावर तलवार, कटावणी आणि लोखंडी सळईने बंदगी यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केले. हा हल्ला होत असताना बंदगी यांचे प्राण वाचविण्यासाठी धावून आलेला त्यांचा भाचा महिबूब बागवान याच्याही डोक्यावर तलवारीने प्रहार करण्यात आला. इतर दोघांना मारहाण करण्यात आली.
हेही वाचा : “अजित पवार आणखी पाच-सहा दिवस थांबले असते, तर त्यांची इच्छा…”; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
या गुन्ह्याची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात होऊन फौजदार अश्विनी काळे यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपींविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले होते. या खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी आठ साक्षीदार तपासले. यात जखमी फिर्यादी बंदगी सिंदगीकर यांच्यासह नेत्र साक्षीदार, पोलीस तपास अधिकारी, वैद्यकारी अधिकारी आणि पंच यांची साक्ष महत्वाची ठरली. आरोपींतर्फे ॲड. मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले,