सोलापूर : चार दिवसांपूर्वी रोहिणी नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर थंडावलेले तापमान पुन्हा वाढू लागल्यामुळे सोलापूरकर हैराण झाले आहे. तापमानाचा पारा पुन्हा ३४.८ अंशांवरून पुन्हा चाळिशी पार केला आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माही वाढल्यामुळे सुटलेल्या घामाने सोलापूरकर त्रस्त झाले आहेत. २६ मे रोजी शहर व जिल्ह्यात वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह सरासरी २५ मिलीमीटर एवढा जोरदार पाऊस पडला होता. त्यामुळे हवामानात बदल होऊन तापमान ४२ अंशांवरून थेट ३४ अंशांवर उतरले होते. परंतु त्यानंतर पुन्हा पावसाच्या सरी कोसळल्या नाहीत.
हेही वाचा : सांगली: सागरेश्वरमध्ये १७१ चितळ, २२० सांबर
परिणामी, तापमान पुन्हा हळूहळू वाढत चाळिशी पार करीत आहे. काल गुरूवारी ४० अंशांवर तापमान मोजल्यानंतर शुक्रवारी दुस-या दिवशी त्यात पुन्हा वाढ होऊन ४०.४ अंशांवर तापमान पोहोचले. दरम्यान, यंदाच्या असह्य उन्हाळ्यात तापमानामुळे अंगाची लाही लाही होत असताना ताप, उलटी, जुलाब आदी आजार वाढत आहेत. शरीरातील तापमान १०२ ते १०६ डिग्री सेल्सिएसपर्यंत वाढलेल्या रूग्णांची संख्या वाढत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर मंडळी सांगतात.