सोलापूर : सोलापुरात एका शाळेतील तीन अल्पवयीन मुलींचा एका ६८ वर्षांच्या विकृत वृद्धाने विनयभंग केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी त्यास अटक करण्यात आली असून पोलिसांनीही गुन्ह्याचे गांभीर्य विचारात घेऊन ४८ तासांत तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल केले आहे.
यल्लाप्पा कुंजीकुरवे असे आरोपीचे नाव आहे. जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शाळेतील तीन अल्पवयीन मुलींच्या बाबतीत विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तिन्ही पीडित मुलींनी याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिकेकडे तक्रार केली होती. त्यावर मुख्याध्यापिकेनेही कोणताही हलगर्जीपणा न करता गंभीर दखल घेतली आणि स्वतः थेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदविली.
गुन्हा दाखल होताच आरोपीचा शोध घेण्यात आला. त्यास अटक करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर पोलिसांनी या गुन्ह्याचा तत्काळ तपास करून ४८ तासांत आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र तयार करून न्यायालयात दाखल केले.
अलीकडे शहरात काही शाळांमध्ये अल्पवयीन मुलींचा तेथील शिक्षक किंवा शिपायांकडूनच विनयभंग करण्याचे प्रकार घडल्याने त्याबाबत पालकवर्ग चिंता व्यक्त करीत आहे. त्यात आता एका ६८ वर्षांच्या विकृत मनोवृत्तीच्या वृध्दानेही एका शाळेतील तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे.