सोलापूर : राज्यात विकासाचा मुद्दा घेऊन आपला पक्ष भाजप आणि शिवसेना शिंदे गटाबरोबर सत्तेत सहभागी असला तरी आपण धर्मनिरपेक्ष विचारधारा सोडलेली नाही. आम्ही शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन जात आहोत. काही मंडळी जनतेची दिशाभूल करतात. पण कोणत्याही धर्म, जात, पंथाबद्दल आकस न ठेवता गोरगरीब शेतकरी व जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यावर आपला भर असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अध्यक्ष, मुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

सोलापूर जिल्ह्यात मोहोळ व टेंभुर्णी येथे जनसन्मान यात्रा घेऊन अजित पवार आले होते. मोहोळ येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांशी त्यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. येत्या पंधरा दिवसांत कोणत्याही क्षणी आगामी विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याचे संकेतही त्यांनी यावेळी बोलताना दिले. त्यांच्यासोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची उपस्थिती होती.

हेही वाचा : Sharad Pawar : “गृहविभागाने दाखवलेला हलगर्जीपणा…”, अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

लाडकी बहीण योजनेपाठोपाठ लाडक्या भावांना दिलासा देण्यासाठी राज्यातील ४४ लाख छोट्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची कार्यवाही येत्या महिनाभरात सुरू होईल. तीन, पाच आणि साडेसात अश्व शक्तीपर्यंत वीज मोटार वापरणाऱ्या शेतकऱ्यांना मागील थकीत वीज बिले आता भरावी लागणार नाहीत आणि पुढे महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास आणखी पाच वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाईल, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. लाडकी बहीण योजनेत धर्म, जात, पंथ न पाहता वार्षिक अडीच लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्या सर्व महिलांना लाभ दिला जात असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

यावेळी सुनील तटकरे यांच्यासह मोहोळचे आमदार यशवंत माने व इतरांची भाषणे झाली. मोहोळचे वजनदार नेते, आमदार राजन पाटील-अनगरकर यांना राजकीय बळ देण्यासाठी अजित पवार यांची जनसन्मान यात्रा झाल्याचे बोलले जाते.