सोलापूर : सोलापूरचे सामाजिक, आर्थिक, शेतीचे भवितव्य अवलंबून असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा केवळ नियोजनशून्य जल व्यवस्थापनामुळे झपाट्याने खालावला असून आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा विचार करता सध्या धरणातील उरलेसुरले पाणी फक्त पिण्यासाठी राखून ठेवण्यात आले आहे. या धरणात पुणे जिल्ह्यातील वरच्या धरणांतूनही पाणी सोडता येणे शक्य नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. सोलापुरात शनिवारी प्रसार माध्यमांशी बोलताना पवार यांनी उजनी धरणाच्या पाणी नियोजनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नापसंती व्यक्त केली. या धरणातून आता शेतीसाठी पाणी मिळणे विसरा, असे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गतवर्षी कमी पावसामुळे ६०.६६ टक्क्यांपर्यंतच झालेला पाणीसाठा अवघ्या साडेतीन महिन्यात संपूर्ण उपयुक्त ३३ टीएमसी पाणीसाठा संपून आता उणे पातळीतील साडेतीन टीएमसी पाणीसाठाही फस्त झाला आहे. आजअखेर धरणात केवळ वजा सात टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कालवा सल्लागार समितीने उजनी धरणातील पाणी नियोजन ठरविताना चालू फेब्रुवारीअखेर वजा १४.९५ टीएमसी म्हणजे वजा २७.९० टक्के पाणीसाठा गृहीत धरला होता. प्रत्यक्षात जलव्यवस्थापनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शनिवारपर्यंतच (३ फेब्रुवारी) धरणात पाणीसाठा वजा ७ टक्क्यांपर्यंत खालावला आहे. त्याचा विचार करता चालू महिन्यापर्यंत नियोजनापेक्षा जास्त पाणीसाठा खालावण्याची आणि उन्हाळ्यात पाण्याचे संकट अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

हेही वाचा : VIDEO : आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबाराचे सीसीटीव्ही चित्रण आले समोर

प्राप्त परिस्थितीत उजनी धरणातील खालावत चाललेला पाणीसाठ्याचा विचार करता पुणे जिल्ह्यातील वरच्या धरणांतून दहा टीएमसी पाणी उजनी धरणात सोडण्याची मागणी होत आहे. करमाळा तालुक्यात या मागणीसाठी आंदोलन होत आहे. यापूर्वी उजनी धरण तळ गाठले होते, त्यावेळी तत्कालीन ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमुख पुढाकारामुळे या धरणात पुणे जिल्ह्यातून पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा काही वर्षांनी उजनी धरणातील पाणीसाठा खालावला असता या धरणात पुणे जिल्ह्यातून पाणी सोडण्याची मागणी जोर धरत होती. त्यासाठी जनहित शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर देशमुख यांनी आंदोलन केले होते. परंतु अजित पवार यांनी त्या आंदोलनाची खिल्ली उडवत उजनी धरणात पाणी सोडण्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे ते स्वतः अडचणीत आले होते. त्यांच्यावर माफी मागण्याची नामुष्की ओढवली होती.

हेही वाचा : “ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण देणे अशक्य”, घटना अभ्यासक उल्हास बापट यांचे मत

या पार्श्वभूमीवर आता मात्र पुणे जिल्ह्यातील धरणांतून उजनी धरणातून पाणी सोडणे केवळ अशक्य असल्याचे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. पुणे जिल्ह्यात खडकवासला व अन्य धरणांतील पाण्यावर अवलंबून असलेल्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता तेथून उजनी धरणात पाणी सोडता येणार नाही. उजनी धरणात मुळात ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत ६०.६६ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा स्थिरावला असताना त्याचा विचार करता पाणी व्यवस्थापनाचे नियोजन योग्य प्रकारे होणे गरजेचे होते. परंतु उपलब्ध कमी पाण्याचा काटकसरीने वापर न करता उलट वारेमाप वापर करून पाणी नियोजनाचे बारा वाजविल्याचे सांगत त्याबद्दल पवार यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून पाणीपुरवठा होतो. जलवाहिनी योजनेसाठी धरणात पाण्याचा तिबार उपसा करावा लागणार आहे. त्यासाठी सोलापूर महापालिकेला साडेतीन कोटींचा निधी दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In solapur ajit pawar said that it is impossible to release water from pune district dams to ujani dam css
Show comments