सोलापूर : राजकीय आयुष्यात अधूनमधून माझ्या हातून चुका झाल्या. परंतु प्रत्येक वेळी शरद पवार यांनी या चुका पदरात घेतल्या. आम्ही दोघे वेगवेगळ्या पक्षात राहूनही पवारांनी मला कधीही अंतर दिले नाही. मी पुढे जात असताना कधीही मागे खेचले नाही. यशवंतराव चव्हाण यांच्यापेक्षा काकणभर जास्त त्यांनी माझ्यावर प्रेम केले आणि प्रोत्साहन दिले, असे भावोद्गार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काढले.

अकलूज येथे सुशीलकुमार शिंदे यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा विशेष सत्कार सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी शिंदे यांनी आपल्या राजकीय आयुष्याचा पट उलगडून दाखवत पवार यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, कोल्हापूरचे छत्रपती, खासदार शाहू महाराज, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदींची प्रमुख उपस्थित होती. लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या राज्यातील सर्व नवनिर्वाचित खासदारांनाही सन्मानित करण्यात आले. या निमित्ताने हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे मोठे शक्तिप्रदर्शन अकलूजमध्ये पाहावयास मिळाले. सुशीलकुमार शिंदे सत्कार समारंभ समितीच्या माध्यमातून या समारंभास सर्वपक्षीय स्वरूप देण्यात आले तरी प्रत्यक्षात महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणसंग्राम फुटल्याचे पाहावयास मिळाले. सत्कार समारंभ समितीचे प्रमुख, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी प्रास्ताविक तर त्यांचे चुलत बंधू असलेले भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी स्वागत केले.

हेही वाचा : गणपतीपुळे समुद्रात जिंदाल कंपनीचे तिघे बुडाले; दोघांचा बुडून मृत्यू, एकाला वाचविले

सुशीलकुमार शिंदे यांनी अकलूजच्या भूमीवर मनाचा मोठेपणा दाखवून केलेल्या आपल्या सत्काराबद्दल मोहिते-पाटील कुटुंबीयांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना, हा सत्कार सोहळा घडवून आणण्यास शरद पवार हे कारणीभूत असल्याचा आवर्जून उल्लेख केला. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या कार्यकाळात आपणास महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद सांभाळण्यास सांगितले गेले होते. परंतु नंतर ही जबाबदारी शरद पवार यांच्याकडे सोपविण्यात आली. त्याचा घटनाक्रमही शिंदे यांनी कथन केला. त्याच सुमारास शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडला नसता तर ते पंतप्रधान झाले असते, असेही शिंदे यांनी सांगून टाकले.

हेही वाचा : “लाडकी बहिण योजना कुणीही कधीही बंद पाडू शकणार नाही”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडताना शरद पवार म्हणाले, सत्ताकारणात सुशीलकुमारांनी माझ्यापेक्षा जास्त सत्तापदे मिळविली. परंतु त्यांनी सत्ता कधीही डोक्यात जाऊ दिली नाही. त्यांनी आपले पाय सदैव जमिनीवर ठेवले. हेच त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे मोठे यश आहे, असे गौरवोद्गार पवार यांनी काढले. त्यावेळी बाळासाहेब थोरात व जयंत पाटील यांच्यासह कोल्हापूरचे छत्रपती, खासदार शाहू महाराज, सांगलीचे खासदार विशाल पाटील आदींनी मनोगत मांडले.