सोलापूर : एकीकडे सामाजिक न्यायाच्या जाणिवेतून तृतीय पंथीयांना सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी रेशनकार्ड, आधारकार्ड, रहिवास दाखल्यांसह हळूहळू का होईना, स्थान दिले जात असताना सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातील खंडाळीसारख्या गावात महिला बचत गटात तृतीय पंथीयांना सामावून घेण्यात आले आहे. या बचत गटाच्या सचिवपदाचा मान एका तृतीय पंथीयाला मिळाला आहे. या निवडीची सकारात्मक चर्चा माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात होत आहे.

सूरज कांबळे असे बचत गटाच्या सचिवपदी निवड झालेल्या तृतीय पंथीयाचे नाव आहे. माळशिरस तालुक्यात यापूर्वी तरंगफळ गावच्या सरपंचपदी ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कांबळे या तृतीय पंथीयाची थेट सरपंचपदी निवड झाली होती. त्यानंतर एखाद्या महिला बचत गटात तृतीय पंथीयांना सामावून घेणे आणि त्यात सचिवपदी तृतीय पंथीयाची निवड होणे, ही आणखी आश्वासक बाब मानली जात आहे.

हेही वाचा : Koyna Dam: कोयनेचे दरवाजे दीड फुटांवर, पाणलोटात १२.३० इंच पाऊस; सांगली, कोल्हापूर महापुराच्या उंबरठ्यावर

अलिकडे शासनाने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्यापाठोपाठ माझा लाडका भाऊ योजनाही जाहीर केली आहे. लाडकी बहीण योजानेसाठी लाखो महिलांचे अर्ज भरले जात आहेत. परंतु अशा योजनांमध्ये तृतीय पंथीयांना कोणतेही स्थान मिळाले नाही. त्याची चर्चा खंडाळी गावात महिला बचत गटात उपस्थित झाली आणि त्यातून बचत गटात तृतीय पंथीयांना सामावून घेण्याचा विचार समोर आल्याचे बचत गटाच्या अध्यक्षा शाबेरा शेख सांगतात.

हेही वाचा : विरोधकांच्या पोपटपंछीला फसू नका, उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे महिलांना आवाहन

महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित ‘ उमंग लोक ‘ संचलित खंडाळी गावच्या दुर्गामाता महिला बचत गटाच्या सचिवपदी सूरज कांबळे या तृतीय पंथीयाची एकमताने निवड होताच महिला आर्थिक महामंडळाचे तालुका कार्यक्रम अधिकारी रणजित शेंडे, उमंग लोक संचलित साधन केंद्राचे व्यवस्थापक शिवाजी शेंडगे, दुर्गामाता महिला बचत गटाच्या अध्यक्षा शाबेरा शेख आदींनी सूरज कांबळे यांचा सत्कार केला.