सोलापूर : रक्तरंजित राजकारणाची वाईट परंपरेमुळे नेहमीच संवेदनशील राहिलेल्या आगामी बार्शी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत आणि त्यांचे कट्टर विरोधक माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यातच थेट लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. आमदार राऊत यांनी भाजपकडून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. तर तळ्यात- मळ्यात असलेले दिलीप सोपल यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून उभे राहण्याचे संकेत दिले आहेत.
आमदार राऊत आणि सोपल यांच्या मागील २५ वर्षांपासून सतत संघर्ष होत आहे. विधानसभा, नगरपरिषद, जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती अशा बहुसंख्य निवडणुकांमध्ये या दोन्ही गटांतच टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला आहे. यातून होणाऱ्या रक्तरंजित राजकारणामुळे बार्शी परिसर नेहमीच संवेदनशील मानला गेला आहे. मूळचे शरद पवारनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे दिलीप सोपल हे १९८५ पासून सहावेळा विधानसभेवर निवडून गेले होते. २००४ आणि २०१९ अशा दोनवेळा त्यांचा आमदार राऊत यांनी अनुक्रमे काँग्रेस आणि भाजप पुरस्कृत अपक्ष या माध्यमातून पराभव केला होता. आमदार राऊत हे यंदा बार्शी विधानसभेची निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढविण्याची भूमिका जाहीर केली आहे. गेल्या पाच वर्षांत मतदार संघात चार हजार कोटींपेक्षा अधिक विकास निधी महायुती सरकारने दिला आहे. भविष्यात आणखी मोठा निधी मिळणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व स्वीकारल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
हेही वाचा : ‘नॉन क्रीमीलेअर’ उत्पन्न मर्यादा १५ लाख? केंद्राला शिफारस ; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज प्रस्ताव
दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी माजी मंत्री दिलीप सोपल हे सध्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात असले तरी गेल्या पाच वर्षांत ते सक्रिय नव्हते. अलीकडे ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आगामी बार्शी विधानसभा निवडणुकीत सोपल हे शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष की राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यापैकी कोणत्या पक्षाकडून उभे राहणार, याची उत्सुकता आहे. मात्र, त्यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेऊन आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून लढविण्याचे संकेत दिले आहेत.