सोलापूर : शासनाने महिलांसाठी नुकत्याच जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व उच्च शिक्षणमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सोलापुरात आयोजिलेल्या महिला कृतज्ञता मेळाव्यात अचानकपणे वादळी वारे सुटले आणि पाठोपाठ पाऊसही झाल्यामुळे त्यात मेळाव्यास्थळी उभारलेला भलामोठा मंडप उडाला. तेव्हा सर्वांची तारांबळ उडाली. शेवटी पावसातच चिंब भिजून चंद्रकांत पाटील यांना भाषण उरकावे लागले. त्यावर, सध्या कोणतीही निवडणूक नसताना पावसात भाषण करावे लागल्याचे मिश्किल भाष्य त्यांनी केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शहरातील रामवाडी-लिमयेवाडीच्या सेटलमेंट मैदानावर शनिवारी दुपारी चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला आणि मुलींचा कृतज्ञता मेळावा आयोजिला होता. पाटील यांचे विश्वासू सहकारी मोहन डांगरे यांचे आई प्रतिष्ठान आणि माणुसकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यात एक हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार होता. त्यासाठी दोन हजार महिला बसतील एवढा कापडी मंडप उभारण्यात आला होता. सेटलमेंट-रामवाडीचा परिसर सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचा मजबूत गड म्हणून ओळखला जातो.
हेही वाचा : सोलापुरात भिशी व फायनान्सच्या माध्यमातून २.६९ कोटींची फसवणूक, १३२ ठेवीदारांना दाम्पत्याने घातला गंडा
ठरल्याप्रमाणे चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कृतज्ञता मेळाव्याला प्रारंभ झाला खरा; परंतु थोड्याच वेळात वादळी वारे जोरात वाहू लागले आणि पावसानेही झोडपून काढायला सुरूवात केली. त्यात उंच मंडपाचे कापड फाटून उडून गेले. मंडपही कोसळू लागला. व्यासपीठ उघडे पडले. तेव्हा आयोजकांसह सर्वांची मोठी तारांबळ उडाली. महिलांची पळापळ सुरू असताना पावसातच चंद्रकांत पाटील यांना भाषण उरकावे लागले. त्यावेळी त्यांनी, सध्या कोणतीही निवडणूक नसताना आपणांस पावसात भाषण करावे लागत असल्याचे मिश्किल टिप्पणी केली. त्यातून २०१९ साली विधानसभा निवडणुकीत साता-यात राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी प्रचारसभेत भर पावसात भिजत केलेल्या भाषणाचे सर्वांना स्मरण झाले.