सोलापूर : सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात सत्ताधारी भाजपचा उमेदवार कोण, याची उत्सुकता अखेर संपली असून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्या रूपाने भाजपकडून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना तगडे आव्हान देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. सोलापुरात भाजपच्या उमेदवारीसाठी मोठी भाऊगर्दी झाली होती. परंतु यात अखेर आमदार राम सातपुते यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे.
हेही वाचा : भाजपाची पाचवी यादी जाहीर, महाराष्ट्रातली आणखी तीन नावं जाहीर, प्रणिती शिंदेंसमोर ‘या’ उमेदवाराचं आव्हान
अवघ्या ३४ वर्षांचे सातपुते हे संघातून तयार झालेले आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून वाढले तरूण नेते आहेत. मूळ बीड जिल्ह्यातील डोईठाण (ता. आष्टी) येथील रहिवासी असलेले सातपुते हे अ. भा. विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री आणि भारतीय जनता युवा मोर्च्याचे प्रदेश उपाध्यक्षपद सांभाळत असताना मागील २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना माळशिरस राखीव मतदारसंघातून निवडून आणण्याची जबाबदारी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यावर सोपविली होती. सोलापूर लोकसभेसाठी त्यांचेच नाव आघाडीवर होते. याशिवाय प्रसिद्ध उद्योजक तथा दलित चेंबर ऑफ काॅमर्स ॲन्ड इंडस्ट्रीजचे संस्थापक-अध्यक्ष, पद्मश्री मिलिंद कांबळे यांचेही नाव संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत होते. परंतु काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांचे आव्हान परतवून लावण्याच्या अनुषंगाने भाजपने विचारपूर्वक आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते यांच्यात थेट लढत होण्याची अपेक्षा आहे.
मागील २०१४ आणि २०१९ सालच्या सोलापूरच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना सलग दोनवेळा पराभव पत्करावा लागला होता. वडिलांच्या पराभवाची सल कन्या म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांच्या मनात आहे. यंदाच्या लोकसभा लढतीत त्या आपल्या वडिलांच्या पराभवाचा वचपा काढणार की भाजपच पुन्हा विजयाची हॕट्रिक साधणार, याचे उत्तर या लढतीतून मिळणार आहे.