सोलापूर : संगणकीकरणामुळे जागेचा बंद झालेला सात-बारा उतारा मिळण्याकरिता तहसील कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यासाठी चार लाख रुपयांची लाच स्वीकारण्यास संमती दिली आणि त्यातील दोन लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्यास संमती देऊन त्यानुसार लाचेची मागणी केल्याप्रकरणी उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील एका मंडल अधिकाऱ्यासह तलाठ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
संदीप भीमराव लटके असे संशयित लाचखोर मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे. तो उत्तर सोलापूर तहसील कार्यालयांतर्गत सोरेगाव महसूल मंडलात नेमणुकीस आहे. तर त्याचा साथीदार पवनकुमार मोहनराव चव्हाण हा तलाठी त्याच्याच नियंत्रणाखालील नेहरूनगर सज्जावर नेमणुकीस आहे. या दोघांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा : Devendra Fadnavis : “अजित पवारांनी आणि मी केलेला रेकॉर्ड…”, देवेंद्र फडणवीस यांची टोलेबाजी
यातील तक्रारदार पर्यवेक्षक म्हणून सेवेत असलेल्या एका कंपनीच्या मालकीचा ८६.६७ आर क्षेत्रफळ आकाराचा भूखंड शहरातील विजापूर रस्त्यावर नेहरूनगर भागात आहे. महसूल प्रशासनात झालेल्या संगणकीकरणामुळे या भूखंडाचा सात-बारा उतारा बंद झाला नव्हता. हा सात-बारा उतारा पुन्हा सुरू करण्याच्या अनुषंगाने महसूल अधिनियम कलम १५५ अंतर्गत उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात प्रस्ताव सादर करायचा होता. या कामासाठी मंडल अधिकारी संदीप लटके व तलाठी पवनकुमार चव्हाण या दोघांनी मिळून तक्रारदाराकडे सहा लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती चार लाख रुपयांची लाच देण्याचे ठरले. त्याचा पहिला हप्ता दोन लाख रुपये स्वीकारण्यासाठी लटके व चव्हाण यांनी संमती देऊन लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयात धाव घेतली. त्यानुसार लाचेच्या मागणीबाबत पडताळणी केली असता लाच मागणीचा प्रकार उजेडात आला. सहायक पोलीस आयुक्त गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्यासह शिरीषकुमार सोनवणे, अतुल घाडगे, सलीम मुल्ला, स्वामीराव जाधव या पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.