सोलापूर : गावच्या जत्रेसाठी पुण्याहून आलेल्या आणि देवाच्या छबिना कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका तरूणावर सातजणांनी मिळून सशस्त्र हल्ला करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना करमाळा तालुक्यातील घोटी गावात घडली. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात बापलेकांसह सातजणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
ऋत्विक चंद्रकांत चव्हाण (वय ३०, रा. येरवडा, पुणे) असे या सशस्त्र हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. तो आपल्या कुटुंबीयांसह करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील प्रसिध्द श्री कोटलिंग देवस्थानाच्या दर्शनासाठी आला होता. दुस-या दिवशी जवळच घोटी गावात देवाची यात्रा असल्यामुळे चव्हाण कुटुंबीय तेथे नातेवाईकाच्या घरी मुक्कामाला होते. रात्री निघालेला देवाचा छबिना पाहण्यासाठी ऋत्विक गेला. छबिना मिरवणुकीत इतर तरूणांसह ऋत्विक हा बेभान हरपून नाचत होता. नाचताना धक्का लागल्यामुळे आनंदा किसन खंडागळे या तरूणाने त्याच्याशी भांडण काढले असता गावक-यांनी मध्यस्थी करून भांडण मिटविले होते. त्यानंतर भांडण का काढले, याचे कारण विचारण्यासाठी ऋत्विक हा आपल्या नातेवाईकासह खंडागळे याच्याकडे गेला. तेव्हा पुन्हा भांडण होऊन त्याचे पर्यवसान ऋत्विक याच्यावरील प्राणघातक हल्ल्यात झाले.
हेही वाचा : राष्ट्रवादीत फूट पडण्याला कोण कारणीभूत ठरलं? जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य; म्हणाले…
आनंदा खंडागळे (वय ३५) याच्यासह त्याचा भाऊ सूरज खंडागळे (वय ३३), वडील किसन खंडागळे (वय ५०), किसन संजय थोरात (वय ३२), शुभम खंडागळे आदी सातजणांनी ऋत्विक यास बेदम मारहाण केली. त्याच्या छातीवर तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला. करमाळा पोलिसांनी हस्तक्षेप करून गंभीर जखमी अवस्थेत ऋत्विक यास रूग्णालयात दाखल केले.