सोलापूर : सौरऊर्जा प्रकल्पासाठी भाड्याने देण्यात येणाऱ्या शेतजमिनीशी संबंधित कागदपत्रांचे उतारे देण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच घेताना अक्कलकोट येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील एका शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून पकडले. त्याच्या विरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महेश भागवत घाडगे (वय ३२, मूळ रा. शिवणे, ता. सांगोला) असे संशयित लाचखोर शिपायाचे नाव आहे. अक्कलकोट तालुक्यातील करजगी गावातील तक्रारदार शेतकऱ्याने आपली ३२ एकर शेतजमीन सौरऊर्जा प्रकल्पासाठी भाडेतत्त्वावर देण्याचे ठरविले होते. त्यासाठी शेतजमिनीशी संबंधित गाव नकाशा, गट नकाशे, स्कीम उतारा, टिपण, फाळणी आणि आकार बंद आदी उतारे मिळण्यासाठी अक्कलकोटच्या भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयात अर्ज दाखल केला होता. हा अर्ज कार्यालयातील शिपाई महेश घाडगे याने स्वतःकडे ठेवून घेतले होते.
अर्जातून केलेल्या मागणीनुसार संबंधित कागदपत्रे देण्यासाठी त्याने सहा हजार रुपयांची लाच मागितली. लाच दिल्यानंतरच दर्जानुसार कार्यवाही होईल, असे त्याने तक्रारदार शेतकऱ्यास सांगितले होते. त्यामुळे तक्रारदार शेतकऱ्याने सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार केली. त्यानुसार पडताळणी करून ठरल्याप्रमाणे अक्कलकोटच्या भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयात सापळा लावून शिपाई महेश घाडगे यास सहा हजारांची लाच घेताना पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांच्या पथकाने केली.