सोलापूर : हिंदू नववर्षाचे स्वागत आणि गुढी पाडव्याचा उत्साह सर्वत्र संचारला असताना यंदाच्या लोकसभा निवडणुकांचे औचित्य साधून राजकीय नेत्यांनी गुढी पाडव्याच्या उत्सवात तेवढा उत्साह दाखविला आहे. सर्वांना शुभेच्छा देत नववर्षात नवीन संकल्प करताना प्रतिस्पर्धी नेत्यांना टोले लगावण्याची संधीही साधल्याचे पाहायला मिळाले. भाजपचे उमेदवार राम सातपुते हे माळशिरसचे आमदार असून गेली चार वर्षे त्यांनी माळशिरस तालुक्यातील आलिशान बंगल्यात गुढी पाडवा साजरा केला होता. यंदा सोलापूर लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून वावरताना त्यांनी सोलापुरात बंगल्यात सपत्निक वास्तव्य केले आहे. या बंगल्यात त्यांनी आपल्या सहचारिणी संस्कृती सातपुते यांच्यासोबत गुढी उभारली.
यावेळी बोलताना राम सातपुते यांनी सोलापूरच्या विकासाचा संकल्प केला. सोलापूरकरांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देताना त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना राजकीय टोला लगावला. सुशीलकुमार शिंदे यांनी यापूर्वी केंद्रात गृहमंत्री असताना प्रथमच हिंदू दहशतवादाचा उल्लेख केला होता, याचा संदर्भ देत, आमदार सातपुते यांनी हिंदू दहशतवाद म्हणणा-या सुशीलकुमारांना आणि त्यांच्या कन्या तथा आपल्या प्रतिस्पर्धी प्रणिती शिंदे यांनाही शुभेच्छा देतो. कारण हिंदू समाज सहिष्णुतेची जपणूक करणारा आहे, अशा शब्दात सातपुते यांनी चिमटा काढला.
हेही वाचा : राज ठाकरेंची मोठी घोषणा! “फक्त नरेंद्र मोदींसाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा!”
दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे यांनी शहरातील भवानी पेठेत घोंगडे वस्तीमध्ये गुढी उभारून हिंदू नववर्षाचे स्वागत केले. यावेळी त्यांनी कोणतेही राजकीय भाष्य न करता गुढी पाडव्याची शुध्दता सांभाळत असल्याचे सांगितले. सोलापूरचा रखडलेला विकास करण्यासाठी तमाम सोलापूरकरांची साथ हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भवानी पेठ-घोंगडे वस्तीचा भाग मागील ३५ वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच बालेकिल्ल्यात आमदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेच्या विजयाची गुढी उभारल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.