सोलापूर : सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते यांच्यात तुल्यबळ लढत होत असताना प्रचाराने वेग घेतला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून वादळी वा-यांसह अवकाळी पावसाचा व्यत्यय प्रचारात येत असला तरी पाऊस अंगावर झेलत प्रचार होत असताना दिसून आले. शहराच्या हद्दवाढ भागात बाळे येथे रात्री वादळी वारा आणि अवकाळी पाऊस सुरू असतानाच काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी पाऊस अंगावर झेलत भाषण केले.
हेही वाचा : किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर टीका; “दात पडलेला, नखं काढलेला, शक्तीहीन वाघ लोकांना..”
यावेळी नागरिकांनीही पावसाची तमा न बाळगता प्रणिती शिंदे यांच्या सभेला प्रतिसाद दिला. उत्तर सोलापूर तालुक्यात कवठाळीसह अन्य गावांमध्ये प्रणिती शिंदे यांनी गावभेटीतून ग्रामस्थांशी संवाद साधला. रात्री शेवटची सभा त्यांनी बाळे येथे घेतली. मात्र सभेला सुरूवात होताच वादळी वा-यांसह अवकाळी पावसाच्या सरी कोसळू लागल्या. परंतु पाऊस अंगावर झेलत प्रणिती शिंदे नागरिकांशी संवाद साधत राहिल्या. तेव्हा नागरिकांनीही पावसाची तमा न बाळगता सभेला प्रतिसाद दिला. शिवसेना उध्दव ठाकरे गटाने या प्रचार सभेचे आयोजन केले होते. पाऊस पडत असताना महिलांनीही पावसाच्या पाण्यात चिंब भिजून प्रतिसाद दिल्यामुळे सभेचा उत्साह वाढला होता. मंगळवेढा, दक्षिण सोलापूर आदी भागांतही अवकाळी पाऊस सुरू असताना निवडणुकीचा प्रचार सुरूच होता.