सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सोलापूर शहर मध्य विधानसभेची जागा माकपला सोडण्याचा शब्द दिला होता. परंतु हा शब्द काँग्रेस कितपत पाळणार,याबाबत माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी संशय व्यक्त करीत, काँग्रेसच्या हालचालीवर टीकात्मक भाष्य केले आहे. काँग्रेसवर विसंबून न राहता सोलापूर शहर विधानसभेची जागा स्वबळावर लढविण्याची भूमिका त्यांनी जाहीर केल्यामुळे सोलापुरात इंडिया आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून २००९ पासून सलग तीनवेळा निवडून आलेल्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी नुकतीच सोलापूर लोकसभा निवडणूक लढविली आहे. त्याचा निकाल हाती येण्यास आणखी काही मोजके दिवस शिल्लक असताना माकपचे नेते आडम मास्तर यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभेची जागा स्वबळावर लढण्याची तयारी करण्याचे जाहीर केले आहे. या मतदारसंघाची पुनर्चना होण्यापूर्वी याच मतदारसंघाचा बहुतांश भाग असलेल्या तत्कालीन सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आडम मास्तर हे १९९५ अणि २००४ साली दोनवेळा निवडून आले होते. या पार्श्वभूमीवर यंदाच्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे काँग्रेसकडून उभ्या असताना त्यांना आडम मास्तर याच्या नेतृत्वाखालील माकपने पाठिंबा दिला होता. प्रणिती शिंदे खासदार झाल्यानंतर त्यांची सोलापूर शहर मध्य विधानसभेची रिक्त होणारी जागा माकपला सोडण्याचे ठरले होते, असा दावा आडम मास्तर यांनी यापूर्वीच केला होता. या जागेसाठी महाविकास आघाडीत शरद पवार, उध्दव ठाकरे आणि नाना पटोले यांच्यात सकारात्मक चर्चा झाली होती. माकपचे नेते सीताराम येचुरी यांच्याशी झालेल्या चर्चेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनीही आपल्या प्रणिती शिंदे यांची शहर मध्य विधानसभेची जागा माकपला सोडण्याचे मान्य केले होते, असा आडम मास्तर यांचा दावा आहे.

हेही वाचा : “मी संन्यास घ्यायला तयार, पण तुम्ही दोषी आढळलात तर…”, दमानियांचा अजित पवारांना इशारा; म्हणाल्या, “त्यांना अक्षरशः…”

लोकसभा निवडणुकीचे मतदान होऊन प्रत्यक्ष निकाल जाहीर होण्यास काही दिवस उरले आहेत. शहर मध्य विधानसभेची जागा रिक्त होण्यासाठी प्रथम सोलापूर लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे निवडून येणे अनिवार्य आहे. दुसरीकडे त्यांच्या विधानसभा जागेसाठी काँग्रेसकडून अनेकजण इच्छूक आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In solapur cpim leader narsayya adam master claim on solapur city central assembly constituency css
Show comments