सोलापूर : एनटीपीसीच्या सोलापूर औष्णिक वीज प्रकल्पामुळे सोलापूरच्या तापमानात वाढ झाल्याची आवई सातत्याने उठविण्यात येत असताना या वीज प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखून तापमानवाढ नाही तर उलट दोन अंश तापमान घटविण्यात आले. येत्या पाच वर्षात आणखी तीन अंश तापमान कमी होणार असल्याचा दावा वीज निर्मिती प्रकल्पाचे सरव्यवस्थापक तपनकुमार बंडोपाध्याय यांनी केला आहे.
सोलापूरपासून २२ किलोमीटर अंतरावर दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी-आहेरवाडी परिसरात एनटीपीसीचे १३२० मेगावाट निर्मिती क्षमतेचा वीज प्रकल्प २०१७ पासून कार्यरत आहे. या प्रकल्पाच्या परिसरात पाच लाखांपेक्षा अधिक वृक्षलागवड केली असून संपूर्ण परिसरात हिरवाई निर्माण झाली आहे. केवळ वीज प्रकल्पातच नव्हे तर वन विभागाच्या जागेतही एनटीपीसीने वृक्षांची लागवड केली आहे. सध्या सार्वत्रिक वृक्षतोड होत असताना एनटीपीसीने लागवड केलेले वृक्ष संरक्षित आहेत. या वृक्षराजीसह पर्यावरणपूरक बाबींची पूर्तता केल्यामुळे सोलापूरच्या तापमानात वाढ नव्हे तर घट होत आहे, असा दावा बंडोपाध्याय यांनी केला आहे. असा प्रयोग यापूर्वी छत्तीसगड आणि तेलंगणातील एनटीपीसी प्रकल्पातून झाल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.
हेही वाचा : सातारा : प्रतापसिंहनगरमधील गुन्हेगारांची अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त, कायमची गुन्हेगारी मोडीत कारवाई
सोलापूर औष्णिक वीज प्रकल्पात कोळशापासून वीज तयार करताना जीवाश्माच्या उत्सर्जनातून सल्फर डायआॕक्साईडच्या रूपाने होणारे प्रदूषण टाळण्यासाठी पाचशे कोटी रूपये खर्च करून दोन युनिट तयार होत असून एक युनिट यापूर्वीच तयार झाला आहे. तर दुस-या युनिटची चाचणी येत्या दोन महिन्यात होणार आहे. या माध्यमातून सल्फर डायआक्साईड ९७ टक्क्यांपर्यंत काढून टाकले जाऊ शकते, अशी माहितीही बंडोपाध्याय यांनी दिली.
हेही वाचा : विशाल पाटलांच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली, “मैत्रीपूर्ण लढत असो किंवा शत्रुत्वाची लढाई..”
सोलापूर औष्णिक वीज प्रकल्पात मागील वर्षभरात वीज निर्मितीचे मागील उच्चांक मागे टाकून सात हजार मिलियन युनिटपेक्षा जास्त वीज निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय २३ मेगावाट सोलर वीज निर्मिती प्रकल्प उभारला जात असून त्यापैकी सध्या दहा मेगावाट सोलर वीज निर्मिती सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. वीज प्रकल्पात वर्षाला सुमारे ११५० रेक कोळसा आयात करावा लागतो. एक रेक चार टनाचा असतो. सध्या प्रकल्पात पाच लाख टन कोळसा उपलब्ध असल्याची माहिती बंडोपाध्याय यांनी दिली.