सोलापूर : वीरशैव लिंगायत समाजाचा मानबिंदू मानल्या जाणाऱ्या सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्याचा मुद्दा यंदा सोलापूर लोकसभा निवडणुकीत ऐरणीवर आला आहे. या प्रश्नावर कारखान्याचे अध्वर्यू धर्मराज काडादी यांनी चिमणी पाडल्याचा बदला घेऊन भाजपला धडा शिकविण्याची हाक कारखान्याच्या २७ हजार सभासद शेतकऱ्यांना दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यासंदर्भात शुक्रवारी दुपारी काडादी समर्थकांसह वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी धर्मराज काडादी यांनी, सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी विमानसेवेच्या नावाखाली पाडून कारखान्यावर अन्याय करण्यात आला असून त्याचा बदला लोकसभा निवडणुकीत घेण्यासाठी सर्वांनी तयार राहावे, असे आवाहन केले. या बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचीही उपस्थिती होती. यावेळी काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला.

हेही वाचा : संजय मंडलिकांसाठी धनंजय महाडिकांनी लावली तब्बल ५ कोटींची पैज, भर सभेत म्हणाले…

काडादी म्हणाले, आमदार प्रणिती शिंदे यांच्या अंगात धमक आहे. सिध्देश्वर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर लगेच साखर कारखाना स्थळावर येऊन त्यांनी पाहणी केली. सर्व कामगारांना धीर दिला, त्यांनी विधानसभेत सुद्धा चिमणीच्या मुद्यावर शासनाला धारेवर धरले होते. सुशीलकुमार शिंदे यांनीही सिध्देश्वर यात्रेवेळी मंत्रालयात येऊन मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन अडचणीचा प्रश्न मार्गी लावला होता, याचे स्मरणही काडादी यांनी केले.

दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, मोहोळ आदी तालुक्यांमध्ये मिळून कारखान्याचे २७ हजार शेतकरी सभासद आहेत.ज्यांनी मला त्रास दिला, कारखान्याची चिमणी पाडून हजारो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त केले, अशा भाजपला चारी मुंड्या चित करा आणि प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी राहा, असे आवाहन काडादी यांनी केले.

हेही वाचा : Maharashtra Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा मुक्काम आता १५ एप्रिलपर्यंत, राज्यात आज कुठे आहे इशारा जाणून घ्या

या बैठकीस माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस शंकर पाटील, सुरेश हसापुरे, सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीचे संचालक अमर पाटील, केदार उंबरजे, अशोक, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, रामदास फताटे आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In solapur dharmaraj kadadi appealed to the sugar factory members to make praniti shinde mp in upcoming lok sabha css
Show comments