सोलापूर : मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे सहाव्यांदा उपोषणास बसले असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सोलापुरात ‘माझी लाडकी बहीण योजने’च्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असतील तर त्यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा सकल मराठा मोर्चाचे समन्वयक माउली पवार यांनी दिला आहे. परंतु त्यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाने जोरदार टीकास्त्र सोडत, त्यांनी हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम उधळून दाखवावा, असे आव्हान दिले आहे.
यानिमित्ताने मराठा समाजाच्याच सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा यांच्यातील बेबनाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या वादाने आता टोक गाठले आहे. २०१८ साली मराठा आरक्षण प्रश्नावर सर्वप्रथम मराठा महामोर्चे निघाले होते, त्यानंतर थोड्याच दिवसांपासून सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा यांच्या शीतयुद्ध सुरू झाले होते. त्यांच्यातील वाद आता पुन्हा एकदा समोर आला आहे.
हेही वाचा : सातारा महामार्गालगतची वेळे प्रस्तावित औद्योगिक वसाहत रद्द, सरकारची अधिसूचना जारी
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या वचनपूर्तीच्या निमित्ताने येत्या २५ सप्टेंबर रोजी सोलापुरात लाडकी बहीण लाभार्थी महिलांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी आक्षेप घेतला आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे हे आंदोलन पेटवत आहेत. ते सहाव्यांदा उपोषणास बसले असताना त्याकडे दुर्लक्ष करून जर लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा सोलापुरात होणार असेल तर हा सोहळा उधळून लावण्यात येईल, इशारा माऊली पवार यांनी दिला आहे. दरम्यान सकल मराठा समाज संघटनेत बहुसंख्य नेते व कार्यकर्ते महाविकास आघाडीशी निगडित आहेत. त्यांनी हा इशारा देताच त्यास मराठ समाजाच्या दुसरा गट मराठा क्रांती मोर्चाकडून विरोध स्पष्ट झाला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे नेते महायुतीशी संबंधित आहेत. यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे, दिलीप कोल्हे, भाजपचे अनंत जाधव, किरण पवार यांचा समावेश आहे. मराठा महासंघाचे स्थानिक नेते दास शेळके हे सुद्धा मराठा क्रांती मोर्चामध्ये सक्रिय आहेत. या मंडळींनी सकल मराठा समाजाच्या भूमिकेला विरोध दर्शविला आहे. आरक्षण प्रश्नावरील जरांगे यांच्या भूमिकेला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनीही मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा हीच आमची ही भूमिका आहे. परंतु काही मंडळी महाविकास आघाडीची सुपारी घेऊन मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम उधळण्याचा इशारा देत आहेत. या मंडळींनी खरोखर मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम उधळूनच दाखवावा, त्यांना पोलिसांनीही ताब्यात न घेता मोकळे सोडावे, असे अमोलबापू शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले.