सोलापूर : शतकानुशतके ‘ज्वारीचे कोठार’ म्हणून ओळख असलेल्या मंगळवेढ्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात यंदा लांबलेल्या पावसामुळे केवळ ७३ टक्के एवढाच ज्वारीचा पेरा झाला आहे. मंगळवेढ्यात तर जेमतेम ५५ टक्के, तीसुद्धा उशिराने पेरणी झाली आहे. त्यामुळे यंदा ज्वारीच्या उत्पादनासह खमंग, चवदार आणि लुसलुशीत हुरडा खूपच कमी प्रमाणात मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळवेढ्याच्या मालदांडी ज्वारीची खमंग, खरपूस अशी भाकरी घास मोडल्याबरोबर तोंडात विरघळते. देशभर मागणी असलेल्या या ज्वारीला यापूर्वीच जीआय मानांकन मिळाले आहे. मुबलक प्रमाणात उत्पादन होणारी येथील ज्वारी केवळ भाकरी आणि हुरड्यापुरती नाही, तर त्यापासून अन्य उपपदार्थांसाठी नावारूपाला आली आहे.

हेही वाचा : “बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला

मंगळवेढ्याच्या पूर्व भागात सुमारे १४५ चौरस किलोमीटर जमिनीचा पट्टा सपाट, कसदार, पूर्णतः खोलवर काळ्याभोर मातीचा आहे. थोड्याशा पावसाने येथे ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. रब्बी हंगामात येथील ज्वारीचे सरासरी पेरणी क्षेत्र ३५ हजार ४५७ हेक्टर आहे. परंतु यंदा भरलेल्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस लांबला. त्यामुळे उशिरापर्यंत शेतात वापसा तयार न झाल्यामुळे ज्वारीची पेरणी अनेक दिवस खोळंबून राहिली. ऑक्टोबरपर्यंत केवळ ३० टक्क्यांपर्यंत पेरणी झाली. त्यानंतर उशिराने का होईना शेतकऱ्यांनी ज्वारीची लावली. तरीही आतापर्यंत जेमतेम ५५ टक्के म्हणजे १९ हजार ५७३ हेक्टर क्षेत्रांतच पेरणी होऊ शकली.

खरीप हंगाम संपताच साधारणतः ऑगस्टपासून रब्बी ज्वारीची पेरणी सुरू होते. १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत पेरणी संपते आणि डिसेंबर-जानेवारीमध्ये शेतात कोवळ्या ज्वारीचा हिरवा, सोनेरी हुरडा तयार होतो. हुरड्याचा हंगाम संपताच परिपक्व झालेल्या ज्वारीची काढणी होते.

हेही वाचा : सोलापूर : नामसाधर्म्याचा फायदा घेऊन बनावट कुलमुखत्यारपत्राद्वारे फसवणूक

तथापि, यंदा लांबलेल्या पावसाबरोबरच वाढलेली शेतमजुरी, वाढलेला लागवड खर्च यामुळे ज्वारीचा पेरा निम्म्यावरच होऊ शकला. परिणामी, यंदा ज्वारीची भाकरी आणि हुरडा निम्म्यावरच मिळणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामात ज्वारीचे सरासरी क्षेत्र तीन लाख १८ हजार ५७ हेक्टर एवढे असून, त्यांपैकी दोन लाख ३३ हजार ३५६ हेक्टर क्षेत्रात (७३.५३ टक्के) ज्वारीचा पेरा तसा उशिरानेच झाला आहे. मंगळवेढ्याबरोबर बार्शी, माढा, करमाळा, अक्कलकोट, सांगोला, दक्षिण सोलापूर आदी भागात ज्वारी होते. परंतु बार्शी (११९ टक्के) व अक्कलकोट (९७.८९ टक्के) यांचा अपवादवगळता इतर भागांत पेरा कमी झाला आहे. करमाळ्यात ज्वारीचे सरासरी पेरणी क्षेत्र ५४ हजार ६३६ हेक्टर असताना प्रत्यक्षात २६ हजार २०५ हेक्टर क्षेत्रावरच (४७.९६ टक्के) पेरा झाला आहे. सांगोल्यात सरासरी ३५ हजार ४५७ हेक्टर क्षेत्रापैकी २१ हजार ४८५ हेक्टर (५७.३३ टक्के) क्षेत्रात ज्वारीचे उत्पादन घेतले जात आहे. गतवर्षीच्या रब्बी हंगामात मंगळवेढ्यात ८०.१९ टक्के ज्वारीच्या पेरण्या झाल्या होत्या. बार्शीत १४९ टक्के, करमाळ्यात ६४.४८ टक्के, सांगोल्यात ६६.४२ टक्के, माढ्यात ८६ टक्के, दक्षिण सोलापुरात ८१.५२ टक्के, अक्कलकोटमध्ये ७३.१७ टक्के ज्वारीची लागवड झाली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In solapur district jowar sowing 73 percent whereas in mangalwedha only 55 percent jowar due to extended monsoon season css