सोलापूर : एकीकडे केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यामुळे कांदाचा भाव गडगडला असतानाच त्यात हिट ॲन्ड प्रकरणांतील दोषी जड वाहनचालकांविरूध्द नव्याने आलेल्या कठोर कायद्याच्या विरोधात मालवाहतूकदारांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा फटका कांद्यासह शेतीमालाला बसला आहे. मालवाहतूकदारांचा संप मागे घेण्यात आला तरी उतरलेला कांदा बाहेर पाठविण्यासाठी विलंब होत असल्यामुळे व्यापा-यांनी बुधवारी कांदा लिलाव केला नाही. त्यामुळे शेतक-यांना त्याचा नाहक त्रास सोसावा लागला.
गेल्या सोमवारी, १ जानेवारी रोजी भीमा-कोरेगाव येथील शौर्यदिनानिमित्त कांदा बाजारातील माथाडी कामगारांनी सुट्टी घेतली होती. त्यामुळे त्यादिवशी कांदा लिलाव झाला नव्हता. काल मंगळवारी दुस-या दिवशी कांदा आवक वाढली होती. ७२ हजार ४१ क्विंटल कांदा भरून ७२० गाड्या आल्या होत्या. त्यात कांद्याचा भाव आणखी खाली येऊन प्रतिक्विंटल सरासरी दीड हजार रूपयांपर्यंत कांदा विकला गेला. अवघ्या पाच क्विंटल कांद्याला प्रतिक्विंटल ३५०० रूपये भाव मिळाला. तर १४ क्विंटल कांद्याला तर प्रतिक्विंटल अवघ्या शंभर रूपयांवर शेतक-यांची बोळवण करण्यात आली. उर्वरीत कांद्याला केवळ दीड हजार रूपयांच्या आतच भाव मिळाल्यामुळे शेतक-यांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागला.
दरम्यान, कांदा बाजारात शेतक-यांनी आणलेल्या ७२ हजार ४१ क्विंटल कांद्याचा लिलाव झाल्यानंतर हा कांदा तेलंगणा, चेन्नई, ओडिसा आदी दूरच्या ठिकाणी पाठविण्याची घाई व्यापा-यांकडून सुरू असताना त्याला मालवाहतूकदारांच्या संपामुळे खीळ बसली. काल सायंकाळी कांदा व्यापारी, आडते आणि मालवाहतूकदारांच्या प्रतिनिधींची बैठक होऊन त्यात मालवाहतूकदारांची कशीबशी समजूत काढण्यात आली. त्यानंतर उशिरा रात्री नऊपासून कांदा मालमोटारींमध्ये भरला जाऊ लागला. बुधवारी सकाळीही परप्रांतात पाठविण्यासाठी कांदा भरणे सुरूच होते. त्यामुळे व्यापा-यांनी सकाळी कांदा लिलाव न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकरी पुन्हा अस्वस्थ झाल्याचे दिसून आले.