सोलापूर : मणप्पुरम फायनान्स कंपनीच्या सोलापुरातील मुख्य शाखेत सोने तारण कर्ज घोटाळा उजेडात आला असून यात तीन कोटी २८ लाख १२ हजार ८९२ रूपयांची कंपनीची फसवणूक झाली. यात सुमारे सहा किलो सोन्याचीही विल्हेवाट लावण्यात आली. कंपनीत सेवेत असलेल्या अवघ्या १९ वर्षांच्या एका तरूणीनेच हा घोटाळा केल्याचे आढळून आले असून तिच्याविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वृषाली विनित हुंडेकरी (रा.वसुंधरा अपार्टमेंट, देगाव रोड, सोलापूर) असे या घोटाळ्यातील आरोपी तरुणीचे नाव आहे. यासंदर्भात कंपनीचे वरिष्ठ अधिकारी प्रवीण बाबुराव वरवटे (वय ३०, रा. गोरटा -बी, ता. बसवकल्याण, जि. बीदर, कर्नाटक ) यांनी सोलापुरात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मणप्पुरम फायनान्स कंपनीची सोलापुरात लक्ष्मी भाजी मंडईजवळ मुख्य शाखा कार्यरत आहे.
हेही वाचा : “…तर ठेकेदाराला बुलडोझरखाली फेकेन”; नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
या शाखेच्या कार्यालयात १७ नोव्हेंबर २०२२ ते २२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत पाच किलो ९७४ ग्रॅम सोने तारण ठेवून ८१ बनावट कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली. त्यापोटी दोन कोटी ३४ लाख ५२ हजार ३९६ रूपयांची रक्कम कर्जदारांना अदा केल्याचे दर्शविण्यात आले. प्रत्यक्षात एवढी मोठी रक्कम वृषाली हुंडेकरी हिने स्वतःच हडपली. एवढेच नव्हे तर तारण घेतल्याचे दर्शविण्यात आलेल्या पाच किलो ९७४ ग्रँम सोन्याचाही अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.