सोलापूर : शाळेत आणि घरात अभ्यास न करता सतत खोड्या करतो, शाळेत उध्दट वागणुकीबद्दल नेहमीच तक्रारी, सतत मोबाईल पाहणे यामुळे संतापलेल्या पित्याने आपल्या १४ वर्षांच्या मुलाचा विष पाजवून खून केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात उजेडात आली. एरव्ही थंड आणि मवाळ स्वभाव असलेल्या पित्याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, हे पाहून पोलीस यंत्रणाही अवाक झाली आहे.
शहरातील तुळजापूर रस्त्यावर सर्व्हिस रोडवर नाल्यालगत निर्मनुष्य ठिकाणी हा प्रकार घडला. विशाल विजय बट्टू असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. यासंदर्भात विशालची आई कीर्ती बट्टू (वय ३३, रा. भवानी पेठ, सोलापूर) हिने जोडाभावी पेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा पती विजय सिद्राम बट्टू(वय ४३) याचे नाव आरोपी म्हणून निष्पन्न झाले आहे. विशाल गेल्या १३ जानेवारी रोजी सुमारास घरातून बेपत्ता झाला होता. त्याच दिवशी रात्री तो तुळजापूर रस्त्यावरील सर्व्हिस रोडजवळील नाल्यालगत मृतावस्थेत सापडला. जोडभावी पेठ पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करीत तपास हाती घेतला.
हेही वाचा : फडणवीस म्हणाले, “भुजबळांनी आक्षेप सांगावे ”
न्यायवैद्यक तपासणी अहवालात विशाल याच्या शरीरात सोडिअय नायट्रेट नावाचे विष आढळून आल्यामुळे हा खुनाचा प्रकार दिसून आला. पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी तपास करताना विशाल याच्या कुटुंबीयांसह नातेवाईक व शेजारच्या मंडळींकडे चौकशी केली. यात विशाल याचे वडील विजय बट्टू यांनी दिलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळून आल्यामुळे पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता अखेर त्याने आपला मुलगा विशाल याचा खून आपण स्वतः केल्याची कबुली दिली. विजय हा शिवणकामाचा व्यवसाय करतो. तो पत्नीसह मुलगा आणि मुलगी यांच्यासह भवानी पेठेत राहतो. विशाल हा उनाड स्वभावाचा होता. शाळेत अभ्यास न करता उलट इतरांना त्रास द्यायचा. त्याबद्दल शाळेतून सतत तक्रारी येत असत. घरातही तो उध्दट वागायचा. सतत मोबाईल पाहण्यात गुंग असायचा. कितीही समजावून सांगितले तरी त्याच्या वागण्यात बदल होत नव्हता. त्यामुळे संतापलेल्या विजय याने विशाल यास दुचाकीवर बसवून तुळजापूर रस्त्यावर नेले आणि त्यास एका शीतपेयातून सोडिअम नायट्रेट विषारी पावडर मिसळून पाजली. त्यामुळे विशाल थोड्याच वेळात बेशुध्द पडला आणि हे कृत्य करून विजय थंड डोक्याने घरी परतला. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.