सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि लगतच्या धाराशिव जिल्ह्यातील येडशी सीमेवर रामलिंग अभयारण्यासह आसपासच्या गाव शिवारामध्ये गेल्या सव्वा महिन्यापासून दहशत माजविणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यासाठी चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आलेले शीघ्र बचाव पथक आठ दिवस प्रयत्न केल्यानंतर अखेर पुन्हा चंद्रपूरला परतले. त्या ऐवजी आता पुण्याहून दुसरे शीघ्र बचाव पथक दाखल झाले आहे. दरम्यान, राज्याच्या पश्चिम विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) डॉ. क्लेमेंट बेन आणि पुणे वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक एन आर प्रवीण यांच्यासह अन्य वरिष्ठ वन अधिकारी बार्शी व येडशी परिसरात दाखल झाले आहेत.
हेही वाचा : ५ लाख कोटींचे करार, दावोस परिषदेत राज्यात विक्रमी गुंतवणुकीची चिन्हे
यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर व्याघ्र प्रकल्पातून तब्बल ५०० किलोमीटर दूर अंतरावर भटकत बार्शी-येडशी परिसरातील बालाघाट व रामलिंग अभयारण्यात स्वतःचा अधिवास शोधत आलेला वाघ गेल्या सव्वा महिन्यापासून वास्तव्यास आहे. परिसरातील सुमारे १५ गावांच्या शिवारात वाघाने आतापर्यंत २५ जनावरांची शिकार केली आहे. वाघाला जेरबंद करण्यासाठी शासनाने गेल्या १४ जानेवारी रोजी चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील शीघ्र बचाव पथकाला प्राचारण केले होते. निष्णात आणि अनुभवी तज्ज्ञ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या या बचाव पथकाने स्थानिक सुमारे ४५ कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ सोबत घेऊन वाघाला जेरबंद करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. वाघाच्या पायांचे ठसे सापडून त्या दिशेने माग काढला तरी वाघाने बचाव पथकाला वेळोवेळी गुंगारा दिल्याचे दिसून आले. एकीकडे ठिकठिकाणी सापळा कॅमेरे लावून दररोज २० ते २५ किलोमीटर अंतर पायी गस्त घालत असताना दुसरीकडे गुंगारा देणाऱ्या वाघाने गायी, म्हशी, शेळ्यांसह अन्य जनावरांची शिकार करून दहशतीचे सत्र सुरूच ठेवले आहे.
या पार्श्वभूमीवर अखेर चंद्रपूरहून डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या अधिपत्याखाली आलेले शीघ्र बचाव पथक मंगळवारी चंद्रपूरला माघारी गेले. त्या ऐवजी आता पुण्याहून दुसरे बचाव पथक बार्शी व येडशी परिसरात वाघाला जेरबंद करण्यासाठी पोहोचले आहे.